विरोधी पक्षात आहोत, काही गोष्टी सोसाव्या लागणारच, ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी जयंत पाटील यांची जोरदार टीका
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर जमले आहेत.
कृष्णा सोनारवाडकर, सुनील काळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होत आहे. पाटील हे ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. पाटील यांची चौकशी होणार असल्याने ईडी कार्यालयाबाहेर आणि पाटील यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे. या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत ईडी कारवाईचा निषेध नोंदवला आहे. ईडीकडून सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे काही गोष्टी सोसावा्या लागणारच, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी व्यक्त केली आहे.
जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. काही लोकांना वेगवेगळ्या टोलनाक्यावर थांबवलं आहे. सर्वांनी शांत राहावं. मला जे काही विचारलं जाईल त्याची उत्तरं दिली जाणार आहेत. चिंतेचं काही कारण नाही. सर्वांनी शांतता राखा, असं सांगतानाच आपण विरोधी पक्षात आहोत. काही गोष्टी सोसाव्या लागणारच ना. सर्व कसं सहसासहजी होईल? काही गोष्टी होतच असतात. त्यामुळे त्याला तोंड द्यायचं असतं, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.
मुंबईला येऊ नका
जयंत पाटील यांनी ट्विट करूनही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज सकाळी 11 वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील आणि इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.
जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, जयंत पाटील आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याचं समजल्यानंतर पाटील यांच्या हजारो समर्थकांनी आधी पाटील यांच्या घराच्याबाहेर गर्दी केली. यात वारकरीही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर गर्दी केली. यावेळी पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवला. ईडीच्या कार्यालयाबाहेरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधातही या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.