NCP on Raj Thackeray: तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे; राष्ट्रवादीने मनसेला डिवचले
NCP on Raj Thackeray: राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे ट्विट केलं आहे. राज ठाकरे यांनी शेअर केलेली पोस्ट शेअर करत त्यांनी ही टीका केली आहे.
मुंबई: भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केल्यानंतर अखेर मनसेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांचा अयोध्या दौरा रद्द केला आहे. तूर्तास दौरा स्थगित करण्यात येत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनसे (mns) बॅकफूटवर आल्याची जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनीही त्यांना डिवचले आहे. मनसेला काही मदतीची गरज होती तर त्यांनी आम्हाला सांगायचं होतं. आम्ही त्यांना मदत दिली असती, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. तर आता राष्ट्रवादीनेही (ncp) मनसेला डिवचले आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी नवीन भोंगा लावण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे, असा चिमटा राष्ट्रवादीने काढला आहे. तसेच यावर सविस्तर बोलूच, असा सूचक इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने राज ठाकरे यांच्या शैलीतच हे ट्विट करून मनसेला डिवचले आहे.
तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच…@mnsadhikrut #Ayodhya #अयोध्या pic.twitter.com/2I3iI7Kge0
— NCP (@NCPspeaks) May 20, 2022
काय आहे ट्विट?
राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे ट्विट केलं आहे. राज ठाकरे यांनी शेअर केलेली पोस्ट शेअर करत त्यांनी ही टीका केली आहे. तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच…, असं ट्विट राष्ट्रवादीने केलं आहे.
राज ठाकरे यांचं ट्विट काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून तूर्तास अयोध्या दौरा स्थगित केल्याचं ट्विट केलं होतं. तूर्तास अयोध्या दौरा स्थगित. महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच, असं ट्विट राज यांनी केलं होतं. तसेच पुण्यातील सभेचं स्थळ, वेळ आणि तारीखही दिली होती.
मनसेचा विरोधकांना टोला
राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा रद्द केल्यानंतर त्यांच्यावर विविध राजकीय पक्षांनी टीका केली आहे. त्यावर मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांनी ‘तूर्तास स्थगित’चा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत! सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!!, असा इशारा मनसेने दिला आहे.