CM Uddhav Thackeray : फाटाफुटीची चिंता नाहीच, उद्या आपण जिंकणारच; विधान परिषद निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंचा निर्धार
CM Uddhav Thackeray : या निवडणुकीत तुम्हाला काही मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांना हॉटेलात ठेवले आहे. बडदास्त ठेवावी लागते. यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, नगरसेवक, खासदार यांना एकत्रं ठेवणं ही आजची लोकशाही आहे.
मुंबई: उद्याच्या निवडणुकीची (MLC Election 2022) चिंता नाही. मी चिंता करत बसलो तर जे शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमन्यात भिनवलं आहे, त्याचा उपयोग काय? हारजीत तर होतच असते. उद्या तर आपण जिंकणारच आहोत. उद्याचा तर प्रश्नच नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी स्पष्ट केलं. राज्यसभा निवडणुकीत आपलं एकही मत फुटलं नाही. फुटलं कोणतं? त्याचा अंदाज लागला आहे. कोणी काय काय कलाकारी केली तेही कळलं आहे. हळूहळू उलगडा होईल. उद्या फाटाफुटीची चिंता नाही. शिवसेनेते (shivsena) गद्दार मनाचा कोणी राहिला नाहीये. आपण फाटाफुटीचं राजकारण बघत आलो आहोत. कितीही फाटलं फुटलं तरी शिवसेना एक राहिलं आहे. हे आपण इतिहासाला दाखवलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने पवईच्या वेस्ट इन हॉटेलात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या निवडणुकीत तुम्हाला काही मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांना हॉटेलात ठेवले आहे. बडदास्त ठेवावी लागते. यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, नगरसेवक, खासदार यांना एकत्रं ठेवणं ही आजची लोकशाही आहे. उद्याच्या निवडणुकीनंतर याच्याहून चांगलं चित्रं दिसलं पाहिजे. आज आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मोठी संख्या दिसत आहे. याच संख्येने येत्या विधानसभा निवडणुकीत आपले आमदार निवडून आले पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
हे माझं हिंदु्त्व नाहीये
काही लोक हिंदुत्वाचे डंके पिटत आहेत. ज्यावेळी कोणी हिंदुत्वाचा उच्चार करायला तयार नव्हतं, तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है ही विहिंपची घोषणा होती. पण ही घोषणा बोलायलाही कोणी तयार नव्हतं. हिंदुत्व बोलणं हा गुन्हा समजला जायचा. तेव्हा हिंदुत्वाचा नारा शिवसेनेने बुलंद केला. आज जे काही चाललंय ते हिंदुत्व त्यांच्यासाठी असेल माझ्यासाठी नाहीये, अशी टीका त्यांनी भाजपचं नाव न घेता केली.
तरुणांची माथी कोणी भडकवली?
अग्निपथ विरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. का भडकली त्यांची माथी? कोणी भडकवली त्यांची माथी? म्हणून मी आपल्यासभेत बोललो होतो हृदयात राम आणि हाताला काम हवं. आज हेच चित्रं देशात दिसतंय. हृदयात राम आहेच. पण प्रत्येकाला दाखवता येणार नाही. हाताला काम नसेल तर राम राम म्हणून काही उपयोग नाही. सुरुवातीला नोटाबंदी झाली. लोकांमध्ये भय होतं. हुं की चू केलं नाही. निर्णय पचून गेला. शेतकरी कायदे आले. तेव्हा शेतकऱ्यांनी ऐकलं नाही. हटून बसले. मग नाईलाजाने सरकारला एक पाऊल मागे जावं लागंल. आज नवं टुमणं काढलं. वचनं अशी द्या की ती पूर्ण झाली पाहिजे. शिवसेनेने जे जे वचन दिलं ते पूर्ण केलं. दोन कोटी नोकऱ्या देऊ, पाच वर्षात नोकऱ्या देऊ… काहीच दिलं नाही. एखादी योजना आणायची अग्निवीर, अग्निपथ योजना. शिकवणार काय तर सुतार काम. गाडी चालवायला शिकवणार. रंधा मारायला शिकवणार पण नाव अग्निवीर, अशी टीका त्यांनी केली.
सैन्य भाडोत्री, हा काय प्रकार?
चार वर्षासाठी सरकार नोकरी देणार आहे. नंतर नोकरीचा पत्ता नाही. ऐन उमेदवारीच्या वयात शिक्षण नाही. मृगजळ दाखवलं जात आहे. लाखोंनी मुलं आली तर नेमकी किती मुलं कामाला येणार? सर्वात भयानक प्रकार म्हणजे भाडोत्री सैन्य. हा काय प्रकार आहे? असं असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते आणू. टेंडर काढा. आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, आमदार पाहिजे, पंतप्रधान पाहिजे. काढा टेंडर. नाही तरी पाच वर्ष आमचं भाडोत्रीच काम आहे. पाच वर्षानंतर एक्स्टेन्शनसाठी लोकांकडे जावं लागतो. एल-1 असेल तर येईल. मध्यावधी आल्यातर आयटम रिओपन होणार. भाडोत्रीच प्रकार असेल तर सर्वच भाडोत्री ठेवा ना. उगाच काही तरी स्वप्न दाखवायची. तर लोक भडकणार नाही तर काय? असा सवाल त्यांनी केला.