‘धकधक गर्लला’ही ‘मन की बात’ची भुरळ, माधुरी दीक्षित हिने केले पंतप्रधान मोदी यांचे कौतुक; म्हणाली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातच्या 100वा भागाचं प्रक्षेपण काल झालं. राजभवनावर त्याचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. या शोला बॉलिवूडसह सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मन की बातचा काल 100वा भाग होता. हा 100 वा भाग पाहण्यासाठी देशभरातील जनतेने टीव्हीसमोर गर्दी केली होती. मुंबईत तर पाच हजार ठिकाणी स्क्रिनिंग करण्यात आली होती. भाजपच्या सर्व नेत्यांनी मन की बातच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. राजभवनावरही मन की बात कार्यक्रमाची स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. यावेळी अनेक बॉलिवूड स्टार उपस्थित होते. या सुपरहिट शोचे अनेक बॉलिवूड स्टार्सने कौतुकही केले.
#WATCH | After listening to the 100th episode of #MannKiBaat, actor Madhuri Dixit Nene says, “He (PM Modi) is taking out time to understand the problems of common people, this is amazing…” pic.twitter.com/mFjWVq36yU
— ANI (@ANI) April 30, 2023
या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, मधुमेह विशेषज्ञ व कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, ‘डिक्की’चे संस्थापक मिलिंद कांबळे, भरडधान्य उद्योजिका व प्रचारक शर्मिला ओस्वाल, राज्यातील अनेक पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’ कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातील युवक, विद्यार्थी व नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित, शाहीद कपूर, एकता कपूर, रोहित शेट्टी, सोनू निगम, प्रसाद ओक, शैलेश लोढा, अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते.
जग मोदींचं ऐकतं
धकधक गर्ल माधुरी दीक्षितनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं. पंतप्रधान मोदी एक मोठे नेते आहेत. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून ते लोकांच्या हितावर बोलतात. ते लोकांच्या समस्या ऐकून घेतात. ही खरोखरच वेगळी गोष्ट आहे. शहरापासून गावापर्यंतच्या लोकांपर्यंत ते कनेक्टेड आहेत. केवळ देशातच नाही तर जगभरात त्यांचं ऐकलं जातं, असं माधुरी दीक्षित म्हणाली.
हे देशाचे सौभाग्य
भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश झाला असल्याचे सांगून या लोकसंख्येचा देशाला फायदा व्हावा या दृष्टीने पंतप्रधानांनी युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्किल, रिस्कील व अपस्कीलचा मंत्र दिला आहे, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितलं. ‘मन की बात’चे 3 ऑक्टोबर 2014 रोजी पहिल्यांदा रेडिओवरून प्रसारण झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सदर कार्यक्रमातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली, असे सांगताना देशाला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान लाभले हे देशाचे सौभाग्य आहे, असे राज्यपाल म्हणाले.
जनतेशी कनेक्ट असलेले पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांशी कनेक्ट व्हायला आवडते. इतिहासात जेवढे राजा आणि पंतप्रधान झाले त्यांच्यात एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे जनतेशी कनेक्ट राहणे. मन की बात ऐकून मला खूप बरं वाटलं, असं शाहीद कपूर म्हणाला.
आपण भाग्यवान आहोत
मोदींपासून मी सतत प्रेरणा घेत असतो. चांगल्या नेत्याने आपल्याला रस्ता दाखवला तर बाकीच्या गोष्टी सहज सोप्या होतात. आपण नशिबवान आहोत. आपल्याला एवढा चांगला नेता मिळाला हे मला हा शो पाहताना नेहमीच जाणवतं, असं सिनेनिर्माता रोहित शेट्टी म्हणाला.