पोलीस भरतीसाठी मोठी अडचण, या नव्या अटीमुळे उमेदवारांचे होणार नुकसान
Maharashtra Police Recruitment | ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केले आहेत, त्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. एकापेक्षा जास्त जिल्ह्यात केलेले अर्ज नियमबाह्य ठरवण्यात येणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी याबाबत आदेश जारी केली आहे.
Maharashtra Police Recruitment | राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार 471 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पोलीस भरतीची ही प्रक्रिया 5 मार्चपासून सुरु झाली होती. आता त्यासाठी एक नवीन नियम आणला आहे. हा नियम उमेदवारांसाठी अडचणीचा ठरणार आहे. पोलिस भरतीसाठी आता एक जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरले होते. पोलीस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
का घेतला निर्णय
राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत अनेकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अर्ज केले आहेत. परंतु आता त्यांना एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी हमीपत्र द्यावे लागणार आहे. उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात. कारण एका उमेदवाराची दोन जिल्ह्यात निवड झाल्यास तो सोयीचा जिल्हा निवडतो. परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील जागा रिक्त राहते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. प्रशासनाच्या लक्षात ही बाब आल्यामुळे एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची अट करण्यात आली आहे.
आता १७ मे पर्यंत द्यावा लागणार अर्ज
ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केले आहेत, त्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. एकापेक्षा जास्त जिल्ह्यात केलेले अर्ज नियमबाह्य ठरवण्यात येणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी याबाबत आदेश जारी केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पोलिस कार्यालयात १७ मे २०२४ पर्यंत हे हमीपत्र देणे आवश्यक आहे. आता उमेदवाराच्या केवळ एकाच अर्जाला प्राधान्य दिले जाईल. हमीपत्रात उमेदवाराने कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा तपशील द्यावा लागणार आहे. तसेच त्याने किती अर्ज केले आहेत आणि ते कुठे कुठे केले ही माहिती द्यावी लागणार आहे. तसेच एका पदासाठी केवळ एका अर्जालाच प्राधान्य देण्याची हमी त्यास द्यावी लागणार आहे.
भरतीसाठी डॉक्टर, एमबीए उमेदवारांचे अर्ज
पोलीस भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षितांचे अर्ज आले आहेत. 17 हजार 471 पदांसाठी राज्यभरातून 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सरकारी नोकरी आणि बेरोजगारीमुळे हे अर्ज केले आहेत.