मुंबई, पुणेकरांनो सांभाळा, बाहेर पडताना काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खराबच
mumbai pune air pollution : राज्यात पुणे, मुंबईतील हवा हा चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई शहराने प्रदूषणात दिल्लीला मागे टाकले आहे. गेल्या २ महिन्यांपासून मुंबईकरांना दुषित हवेचा सामना करावा लागत आहे. मुंबईप्रमाणे पुणे शहरातील हवेची गुणवत्ता दिवाळीनंतरही सुधारली नाही. यामुळे मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
गिरीश गायकवाड, मुंबई, पुणे | 18 नोव्हेंबर 2023 : स्वच्छ हवा, चांगले वातावरण, राहण्यासाठी उत्तम शहर असलेल्या पुणे शहराची ही ओळख बदलू लागली आहे. आता पुणे प्रदूषित शहर झाले आहे. दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता चांगली होईल, ही अपेक्षा होती. परंतु दिवाळीनंतर पुणे आणि मुंबईदतील हवा खराबच आहे. गेल्या २ महिन्यांपासून मुंबईकरांना दुषित हवेचा सामना करावा लागत आहे. देशाची राजधानी दिल्लीला मुंबईने मागे टाकले आहे. आता मुंबई देशातील सगळ्यात प्रदुषित शहर झाले आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १७४ वर पोहोचला आहे. चेंबूर, बांद्रा, बोरीवली, मालाड आणि कुलाबा या भागाचा समावेश सगळ्यात प्रदुषित ठिकाणांमध्ये आहे.
वाढत्या बांधकामामुळे प्रदूषण
मुंबईत बांधकामे वाढली आहे. विविध विकास कामेही सुरु आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बांधकाम होत असल्याचा फटका पर्यावरणाला बसला आहे. यामुळे मुंबईतील प्रदूषण वाढले आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईत हरियाणा पॅटर्न राबवला जाणार होता. परंतु हा पॅटर्न देखील फोल ठरला आहे. मुंबईत झाडे लावली जाणार होती. त्यावर सध्या काम सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी मियावाकी वने तयार करण्याचाही निर्णय घेतला. पण तो अंमलात आला का? हा चौकशीचा भाग आहे. सध्या मनपा रस्त्यावर पाणी मारून धूळ साफ करत आहे. परंतु त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत नाही. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना घशाचे आजार झाले आहे.
दिवाळीनंतरही पुण्याची हवा खराबच
मुंबईप्रमाणे पुण्याची हवा खराब झाली. दिवाळीनंतर पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा होती. परंतु पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सध्या २०० च्या वर गेला आहे. पुण्याची हवा खराब वर्गवारीत आहे. यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे शहरात खोकला, श्वसन विकार आणि दम्याचे रुग्ण वाढले आहे.
हे कराच
- घराबाहेर पडताना मास्क वापरा
- वयोवृद्ध लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे
- दमा, श्वसनविकाराची औषधे बंद करु नका
- आरोग्यविषयक काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा