Prakash Ambedkar : प्रश्न सुटत नसेल तर आमदार, खासदारांना मारा; प्रकाश आंबेडकर यांचं धक्कादायक विधान
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची काल भेट घेतली. बार्टीची फेलोशीप मिळावी म्हणून या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.
मुंबई: मी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे, तुमचे प्रश्न सुटत नसेल तर आमदार आणि खासदारांना मारा. निवडून दिलेले अनुसूचित जाती, जमातीचे आमदार आणि खासदार प्रश्न सोडवण्यता कच खात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना बडवावे, असं धक्कादायक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशीप हवी आहे. त्याबाबत माझं माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असंही आंबेडकर यांनी सांगितलं.
राज्यातील 861 विद्यार्थी बार्टीची फेलोशिप मिळावी या प्रमुख मागणीसाठी मागील दीड महिन्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आझाद मैदानात या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली. हक्काच्या फेलोशिपसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आझाद मैदानात भेट घतली. शिक्षणातून नवीन पिढी उभी राहत असते. त्यासाठी आंदोलन करावं लागणे दुर्दैवी आहे. इतर संस्थांच्या मागे निवडून दिलेले प्रतिनिधी उभे राहतात, त्यांना हाताखाली घेतल्याशिवाय विषय सुटणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ठाकरेंनाच विचारा
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केलं. शरद पवार महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना भेटले. महाविकास आघाडीची एकजूट राहील की नाही याबाबत उद्धव ठाकरेंना विचारा, असं आंबेडकर म्हणाले. राष्ट्रवादीची भूमिका बदलली आहे. सर्व पक्ष जेपीसी मागत आहेत आणि राष्ट्रवादीची भूमिका वेगळी आहे. अजित पवार यांनी पंतप्रधानांनाही क्लीन चीट दिली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
पंतप्रधानांनी घाबरू नये
यावेळी त्यांनी मोदींनी आपली डिग्री दाखवावी असं आवाहन केलं. पंतप्रधानांनी डिग्री घेतली असेल तर त्यांनी लोकांना पुढे मांडावी. घाबरण्याचे कारण नाही, असा टोला त्यांनी लगावला. लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लोकांनी स्क्रूटनी पासून घाबरू नये, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.