चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये, मी बाबासाहेबांचा… प्रकाश आंबेडकर यांची नारायण राणेंवर सडकून टीका
गेल्या 70 वर्षात अनेक वेळा सत्तापालट झाला. हा सत्तापालट शांततेने पार पडला. यावेळी सत्ता पालट होईल की नाही हे निवडणूक निकालात स्पष्ट होईल. पण निकालाआधी दंगलीचं, अराजकाचं वातावरण दिसेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशात गोध्रा आणि मणिपूरसारखी परिस्थिती होणार असल्याचा दावा केला होता. देशात निवडणुकीच्या पूर्वी दंगली होतील. परिस्थिती हाताबाहेर जाईल, असंही आंबेडकर यांनी म्हटलं होतं. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली होती. आंबेडकरांना ही माहिती कशी मिळाली? त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली पाहिजे, असं राणे म्हणाले होते. राणेंच्या या टीकेचा प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशात अराजकता माजवली जाऊ शकते. तसं प्लॅनिंगही सुरू आहे. नारायण राणेंना एवढंच सांगतो. चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये. मी बाबासाहेंबाचा नातू आहे. एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी या देशातील अनेक अधिकारी बाबासाहेबांना या देशाचे जनक मानतात. तेच अधिकारी मला माहिती देत असतात. त्यामागे ही घटना घडू नये ही अपेक्षा असते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुस्लिमांसारखं सामंजस्य दाखवा
माझं सर्व भारतीयांना आव्हान आहे. डोकं भडकवण्याचं काम होणार आहे. त्यामुळे सावध राहा. जे सामंजस्य मुस्लिमांनी दाखवलं तेच सामंजस्य दाखवा. गणपती विसर्जनाच्या दिवशी ईद साजरी करणार नाही, असं मुस्लिमांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी ईद साजरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हे सामंजस्य वाखाणण्यासारखं आहे. तुम्हीही तेच सामंजस्य दाखवा. दिवाळीनंतर देशातील परिस्थिती हाताबाहेर जाईल. गोध्रा आणि मणिपूर होणार नाही याची काळजी घ्या. मानवतेला काळीमा लागणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायची असते तशी जनतेनेही घ्यायची आहे, असं आंबेडकर म्हणाले.
अनेकांना नोटिसा
सत्ताधाऱ्यांना आदिवासींचे हक्क आणि दलितांचं आरक्षण संपवायचं आहे. हे दोन समूह विरोधात जातील हे लक्षात घेऊन शहरी नक्षलवाद आणि नक्षलवाद याच्या नावाखाली तुरुंगात टाकण्याचं आणि नोटीस देण्याचं काम सुरू झालं आहे. आहे. आज सकाळी काही लोकांना नोटीस बजावली आहे. तुमच्यावर एनआयएची चौकशी का लावू नये असं नोटिशीत म्हटलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.