पुणे-मुंबई प्रवास आता कमी दरात, काय आहे नवीन योजना
pune mumbai : मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन सुविधा मिळणार आहे. एक मेपासून ही सेवा प्रवाशांना सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ही नवीन सुविधेचा दर पूर्वीपेक्षा कमी असणार आहे. यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
गिरीश गायकवाड, मुंबई : मुंबई पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. एकीकडे सर्व महागाई वाढत असताना पुणे-मुंबई प्रवास स्वस्त होणार आहे. प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळ सुरु करत असलेल्या नव्या बसमधून कमी दरात प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे. महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मेपासून ही सेवा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे.
काय आहे योजना
पुणे-मुंबई दरम्यान रोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. रेल्वेमध्ये आरक्षण उपलब्ध नसणे किंवा सोयीच्या भागात बस जात असल्यामुळे अनेक जण बस प्रवासाला प्राधान्य देतात. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बससेवा चांगलीच लोकप्रिय झाली आहे. महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मेपासून या शिवनेरी सेवेत एक महत्वाचा बदल होत आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या ‘शिवनेरी’ बसने मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक एसटी बस अर्थात ‘ई-शिवनेरी’ सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
तिकीट दर असणार कमी
सध्याच्या तिकीट दराच्या तुलनेत कमी दर नव्याने सुरु होणाऱ्या ई-शिवनेरीचे असणार आहे. महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मेपासून ई-शिवनेरी प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. ई-बसचे नामकरण ई-शिवनेरी करण्यात आले आहे. यामुळे ‘शिवनेरी’चा ग्राहक या नव्या गाडीकडेही आकृष्ट होण्याचा महामंडळाला विश्वास आहे. तसेच ईलेक्ट्रिक बसमुळे पर्यावरणाची हानीसुद्धा होणार नाही. प्रदूषण होणार नसल्यामुळे पर्यावरण चांगले राहण्यास मदत होणार आहे.
बससेवेचा इतिहास
1 जून 1948 या दिवशी पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर या मार्गावर धावली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने काळाच्या बदलाप्रमाणे बससेवेत बदल केला. आता आकर्षक रंगसंगती तसेच किफायतशीर आणि आरामदायी प्रवास यामुळे नवीन बस प्रवाशांच्या पसंतीस पडत आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल होत आहे.
नवीन बस टू बाय टू अशी या बसची आसन व्यवस्था आहे. तर एकूण 43 आसने उपलब्ध आहेत. या बसमुळे ध्वनी प्रदुषण होणार नाही त्याासोबतच हवेचे प्रदुषणही टाळले जाणार आहे. ही बस वातानुकूलित आहे.