बंद मुट्ठी लाख की खुल गई तो खाक की; राहुल नार्वेकर यांच्याकडून महापत्रकार परिषदेची एका वाक्यात चिरफाड
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रासोबत निवडणूक निकाल जाहीर केल्याचं पत्र दिलं आहे. घटनेत दुरुस्ती झाली आहे, त्याची कॉपी देत आहोत असा कुठेही उल्लेख केला नाही. केवळ निवडणुकीचा निकालच त्यांनी आयोगाला सादर केला. त्यांच्याकडे घटना दुरुस्तीची प्रत दिल्याची पोचपावती नाही. संघटनात्मक निवडणूक झाली, त्याचा निकाल लागल्याची पोचपावती त्यांच्याकडे आहे, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे.
मुंबई | 16 जानेवारी 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची चिरफाड केली. आम्ही पुरावे सादर केलेले असतानाही आमच्याविरोधात निकाल दिला. हा निकालातून लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे आणि कार्यकारिणीच्या बैठकीचे व्हिडीओ दाखवले. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाने केलेल्या आरोपांची चिरफाड केली आहे. बंद मुट्ठी लाख की खुल गई तो खाक की, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला जशासतसे प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर दिलं आहे. निकाल देताना कोणते निकष वापरले याचीही माहिती दिली आहे. मी 10 जानेवारी 2024 रोजी अपात्रतेचा निकाल वाचून दाखवला. तो जाहीर केल्यावर आज सहा दिवस सातत्याने अनेक माध्यमातून अनेक लोकं विशेषत: काही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते समाजात गैरसमज पसरवत आहेत. भरत गोगावले यांची नियुक्ती कायमस्वरुपी कायमची चुकीची आणि सुनील प्रभूंची कायमची बरोबर आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने कधीच म्हटलं नाही.
कोर्टाने मूळ पक्ष ठरवायला सांगितलं होतं. त्यानुसार मी मूळ पक्ष ठरवला. त्यानंतर मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे पाहून व्हीप नियुक्त केला. मूळ पक्ष ठरवण्यासाठी मी आधी त्या पक्षाची घटना पाहिली. पण त्यांची घटना माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मी निवडणूक आयोगाकडे घटना मागितली आणि त्यानुसार निर्णय दिला. निवडणूक आयोगाकडे जे आहे ते तपासून तेच ग्राह्य धरायला मला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. मला इतर काही गोष्ट करण्यास परवानगी नव्हती, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
पत्र दिलं, पण उल्लेख कुठाय?
निवडणूक आयोगाला पुरावे दिल्याचं आम्हाला सांगितलं जातं. ते खोटं आहे. 2013च्या घटना दुरुस्तीचा त्यांनी उल्लेख केला. मी शिवसेनेच्या निवडणुकीच्यावेळी उपस्थित होतो ते दाखवलं. तुम्ही पत्राचा जो उल्लेख करत आहात, त्यात काहीच म्हटलेलं नाही. त्या पत्रात पक्ष घटनेचा उल्लेखच नाही. त्या पत्रात फक्त पक्षाची कार्यकारिणी निवडल्याचं निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं होतं. घटनेत दुरुस्ती केल्याचा उल्लेखच त्या पत्रात नव्हता. 2018च्या पत्रातही घटनेत दुरुस्ती केल्याचा उल्लेख नव्हता. शिवाय दोन्हीवेळा निवडणूक आयोगाला घटना दिल्याचाही उल्लेख नाही, असं नार्वेकर म्हणाले.
तो युक्तिवादच केला नाही
जो युक्तिवाद आज त्यांनी मीडियासमोर केला. तो माझ्यासमोर केला का? 2013च्या संविधानाबाबत त्यांनी माझ्यासमोर युक्तिवादच केला नाही. अनिल परब हे 4 एप्रिल 2018चं पत्र दाखवत असतात. पण त्यांनी ते पत्र एकदाही वाचून दाखवलं नाही. निवडणुकीचा निकाल त्यांनी आयोगाला कळवला आहे. त्यात त्यांनी संविधान दुरुस्तीचा उल्लेख केला नाही. वस्तुस्थिती मांडत नाहीत. कोणतंही पत्र दाखवतात. काहीही सांगतात. वाचून दाखवत नाही. कारण बंद मुठी लाख की खुल गई तो खाक की, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर हल्ला चढवला.
कंपाऊंडर ऑपरेशन करतात तेव्हा…
कोर्टाचे जे निकष आहेत, त्यानुसार मी निर्णय दिला. राजकीय कार्यकर्ता म्हणून विचार केला तर पक्ष संघटना चालवणं जबाबदारीचं काम असतं. पक्षाची घटना कपाटात ठेवण्याची वस्तू नाही. पार्ट टाईम अध्यक्ष, अर्धवट अध्यक्ष… पार्ट टाईम वकील हे काम करू शकत नाही. त्यासाठी पूर्णपणे पक्षाला डेडीकेट करायचे असते. कंपाऊंडर असे ऑपरेशन करतात तेव्हा निकाल काय असतो ते पाहिलं आहे. जी लोकं संविधानाचे धडे वाचत होते. संविधानाची हत्या केल्याचा आरोप करत आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करायची याच निर्णय जनताच करेल, असंही ते म्हणाले.