आधी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत यांचं नार्वेकर यांना आव्हान
सीमेवर आग लागली आहे. मणिपूर पेटलंय. तुमच्या हातून गेलंय. काश्मीरमध्ये जवानांची हत्या होत आहे. आपलं केंद्र सरकार मात्र कर्नाटकात आहे. हे भाषण करत आहेत. हे भाषण माफीया आहेत. राजकारण आणि राजकीय सुरक्षा यात फरक करा, असंही त्यांनी सुनावलं.
मुंबई : आम्ही न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे. या देशातील राजकीय स्वैराचार रोखण्याची ताकद कोर्टात आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला आजही वाटते, असं सांगतानाच राहुल नार्वेकर यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा. ज्यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला आहे. त्यांना निर्णय घेऊ द्या. नरहरी झिरवळ यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडेच हे प्रकरण गेलं पाहिजे. त्यांचा निर्णय दुसरा अध्यक्ष फिरवू शकत नाही, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
राज्यातील आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्ंयाच हातात येईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी थेट नार्वेकर यांचाच राजीनामा मागितला. राहुल नार्वेकर यांची कायद्या मंत्र्यासोबत बैठक झाली होती. कायदा मंत्र्याने बंद दरवाजाआडच्या बैठकीत काय होणार हे सांगितलं का? तुमच्याकडेच प्रकरण येईल हे तुम्हाला कसं माहीत? ही कोणती दादागिरी आहे? कायदा मंत्री तीन तास बंद दाराआड चर्चा करतात हे काय चाललंय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
गदा डोक्यात पडणार
कर्नाटकाचा निकाल कलाटणी देणारा असेल. कर्नाटक हे दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य आहे. दक्षिणेतील एकमेव राज्य भाजपकडे आहे. ते राहणार नाही. मोदी आणि शाह यांच्यापासून संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपचे नेते आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री कर्नाटकात ठाण मांडून बसले होते. पैशाचा महापूर झाला. बजरंग बलीलाही निवडणुकीत उतरवलं. पण यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंगबलीच त्यांच्या डोक्यात गदा मारणार आहे. हनुमानाची गदा यांच्या डोक्यात पडणार आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
हा पंतप्रधानाचा पराभव
कर्नाटकात मतदान होत आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. देशाचे पंतप्रधान महिनाभर कर्नाटकात तंबू ठोकून होते. गृहमंत्री आणि सर्व मंत्री बसले होते. पण कर्नाटकात इतिहास घडेल. 2024साठी शुभसंकेत होईल. भाजपचा दारूण पराभव होणार आहे. हा पंतप्रधानांचा पराभव असेल, असंही त्यांनी सांगितलं.
शरद पवार मोठे नेते
‘सामना’ गेल्या 40 वर्षापासून राजकीय भाष्य करत आहे. जेव्हा तुमच्यासोबत कोणी नव्हतं तेव्हा सामना तुमची बाजू घेत होता. तुम्हाला काही खटकत असेल तर तुम्ही तुमचं म्हणणं मांडावं. मी माझ्या पक्षाचं म्हणणं मांडत असोत. तुमच्याकडे काही असेल तर बोला. बोलण्याची हिंमत ठेवा, असं सांगतानाच ‘सामना’ला महत्त्व द्या असं मी कुठे म्हणतो. शरद पवार आमचे नेते आहेत. मोठे नेते आहेत, असंही ते म्हणाले.