Attempt To Suicide : …आणि अशाप्रकारे लोहमार्ग पोलिसांनी वाचवला आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचा जीव
शिवडी (Sewri) स्थानकात एकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवडी स्थानकात कार्यरत असणाऱ्या वडाळा (Wadala) लोहमार्ग महिला पोलीस अंमलदार धनश्री पंडित शेलार व महिला होमगार्ड ऋतुजा राहुल मांडये यांच्यामुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचले.
अक्षय मंकणी, टीव्ही9 मराठी, मुंबई : शिवडी (Sewri) स्थानकात एकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवडी स्थानकात कार्यरत असणाऱ्या वडाळा (Wadala) लोहमार्ग महिला पोलीस अंमलदार धनश्री पंडित शेलार व महिला होमगार्ड ऋतुजा राहुल मांडये यांच्यामुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचले.
मोटारमननं पाहिलं सविस्तर वृत्त असं, की शिवडीतील रामगड झोपडपट्टी, शिवडी कोर्ट रोड, टिंबर पॉइंट, हाजी बंदर इथं राहणारे मधुकर साबळे, (वय 59) हे घरगुती अडचणी व वैयक्तिक कारणामुळे त्रस्त होते. यालाच कंटाळून सोमवार, 27 डिसेंबर रोजी शिवडी रेल्वे स्थानकातल्या सीएसएमटी दिशेकडील रेल्वे रुळात लोकल खाली जीव देवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लोकलच्या मोटरमननं लांबूनच हे पाहिलं व लोकलचा वेग कमी करून लोकल थांबवली.
…आणि असा वाचवला जीव त्याचदरम्यान शिवडी स्थानकात कार्यरत असणाऱ्या वडाळा लोहमार्ग महिला पोलीस अंमलदार धनश्री पंडित शेलार व महिला होमगार्ड ऋतुजा राहुल मांडये यांनी एक व्यक्ती रेल्वे रुळात झोपत आहे व समोरून लोकल येत आहे हे पहिलं. त्यांनी क्षणांचाही विलंब न लावता तत्काळ रेल्वे रुळाच्या दिशेनं धाव घेत आत्महत्या करणाऱ्या मधुकर साबळे यांचा जीव वाचवला.
लोहमार्ग पोलिसांच्या धाडसाचं कौतुक या घटनेकडे काळजाचा ठोका चुकवून पाहणाऱ्या प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांच्या धाडसाचं कौतुक केलं. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या साबळे यांना वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांची सून अनिता साबळे (वय 30) यांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आलं.