ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना सांगायला नको; संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचले
हे सरकार कधीही कोसळेल. कोर्टात जे प्रकरण सुरू आहे. जे आमदार पक्ष सोडून गेले ते निलंबित होतील. त्यातील 16 निलंबित होतील. त्यानंतर सरकार जाईल. त्यामुळे सरकार राहणार नाही आणि फडणवीस राहणार नाही.
मुंबई : आमच्या वाट्याला गेले, मुख्यमंत्रीपद गेले, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. राज ठाकरे यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना चांगलं माहीत आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना काढला आहे. तसेच मनसेला पक्षाची वाढ करण्याची अजून गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सरकार कोसळण्याच्या भीतीनेच बजेट सादर करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला. त्यांच्या वाटेला जाण्या इतका त्यांचा पक्ष मोठा नाहीये. सरकार का गेलं हे अख्ख्या जगाला माहीत आहे. त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सरकार फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं. आणि जोडीला खोके होतेच. ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना मी सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे. फक्त ईडीचा अनुभव घेऊनही आमच्या तोफा आणि कार्य सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
हिंदुत्व सोडलं नाही, सोडणार नाही
शिवसेनेने कधीच हिंदुत्व सोडलं नाही. सोडणार नाही. कोणी काय बोलतो त्यावर शिवसेनेची भूमिका ठरत नाही. तुम्ही तुमचं काम करा. शिवसेनेने नेहमी महाष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नावर लढा दिला. त्याला अंतर दिलं नाही, असंही राऊत यांनी ठणकावलं.
कदाचित सरकारचं शेवटचं बजेट
यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरही भाष्य केलं. हे सरकार कधीही कोसळेल. कोर्टात जे प्रकरण सुरू आहे. जे आमदार पक्ष सोडून गेले ते निलंबित होतील. त्यातील 16 निलंबित होतील. त्यानंतर सरकार जाईल. त्यामुळे सरकार राहणार नाही आणि फडणवीस राहणार नाही. या बजेटमध्ये आहेच काय? सर्व खोटं आहे. सरकार कोसळण्याच्या भीतीने बजेट सादर केलं. कदाचित या सरकारचं हे शेवटचं बजेट असेल. घटनेनुसार निर्णय लागला आणि लागेलच आणि 16 आमदार अपात्र ठरेल तर सरकार कोसळेल. सरकार कोसळल्यास लोकांमध्ये जाण्यासाठी थापेबाजीचं बेजट सादर करण्यात आलंय, अशी टीका त्यांनी केली.
त्यांनी जातीचं राजकारण केलं
महाराष्ट्रातील, केंद्रातील सरकारने जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण केलं. महाराष्ट्राची ही परंपरा नव्हती. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पण प्रत्येक ठिकाणी जात दाखवण्याचं काम सरकार करत आहे. शेवटी महाराष्ट्रातील बारा कोटीच्या लोकांना त्यांचा धर्म दाखवावा लागेल. महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.