ठाकरेंच्या ‘मातोश्री’च्या अंगणातच स्वबळावर लढण्याची घोषणा; राजू शेट्टी किती जागा लढणार?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा सहा तालुक्याचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील दोन मतदारसंघ जोडले जातात. यामध्ये इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, बत्तीस शिराळा, इस्लामपूर, शाहूवाडी असा सहा विधानसभांचा लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढणार आहेत.
मुंबई | 2 जानेवारी 2024 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्याशी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. अदानीचा त्रास शेतकऱ्यांनाही आहे. त्या लढ्यात आपली साथ द्यावी, अशी विनंती राजू शेट्टी यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना केली. उद्धव ठाकरे यांनीही शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचंही सांगितलं जातं. पण शेट्टी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच मातोश्रीच्या अंगणातच स्वबळावर लढण्याची घोषणा केली. एवढंच नव्हे तर राजू शेट्टी यांनी स्वबळावर किती जागा लढवणार याची घोषणाही करून टाकली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी मीडियाशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा झाली नाही. कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही. आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत. जेव्हा निवडणुका जाहीर होतील, तेव्हा आम्ही स्वतंत्र लढू. पण आज जनतेच्या प्रश्नावर आम्ही उद्धव ठाकरे यांची मदत मागायला आलो होतो. त्यासाठी मी त्यांना भेटलो, असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
म्हणून शरद पवारांकडे गेलो नाही
जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न तयार होतात. तेव्हा मविआचे नेते हे कारखानदार आणि ठेकेदारांच्या बाजूने असतात. त्यामुळे आमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीत जाणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. अदानी उद्योग समूहाने शरद पवार यांच्या संस्थेला काही आर्थिक मदत केलीय. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यात काही अर्थ नव्हता म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना भेटलो. आम्ही सहा जागा लढणार आहोत. आमची स्वबळाची तयारी सुरू आहे, असं शेट्टी म्हणाले.
आधी उत्तरं द्या, मगच चर्चा
एफआरपीचे तुकडे का झाले? अधिकार नसताना महाविकास आघाडीने एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय का घेतला? महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गाचा प्रश्न आहे. त्यात दुजाभाव झाला आहे. या सर्व गोष्टींचा याचा खुलासा केल्याशिवाय आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार नाही. आधी आमची मुद्दे क्लिअर करा. मग पुढची चर्चा करू, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
हातकणंगलेत काय घडलं होतं?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा सहा तालुक्याचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील दोन मतदारसंघ जोडले जातात. यामध्ये इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, बत्तीस शिराळा, इस्लामपूर, शाहूवाडी असा सहा विधानसभांचा लोकसभा मतदारसंघ आहे. बाळासाहेब माने, कल्लाप्पाण्णा आवाडे, अशा दिग्गज नेत्यांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. तसेच इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचा मोठा दबदबा आहे. 2019 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधील आकडेवारी पाहूया. 2019 लोकसभा निवडणूकित झालेले संपूर्ण मतदान 16 लाख 93 हजार 449. त्यापैकी झालेले मतदान 12 लाख 26 हजार 933
कुणााकुणाची लढत?
धैर्यशील माने (शिवसेना) – 5 लाख 87 हजार 756
राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष) – 4 लाख 80 हजार 292
हाजी असलम सय्यद (वंचित बहुजन आघाडी) – 1 लाख 20 हजार 584
विजयी – धैर्यशील माने हे 93785 मतांनी निवडून आले होते.