मोठी बातमी! मनोज जरांगे यांना पोलिसांची नोटीस, नंतर रोहित पवार मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांना आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानात आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहेत.
मुंबई | 25 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा लवकरच मुंबईत धडकणार आहे. मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. पण त्याआधी आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये जरांगे यांना आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन करता येणार नाही, असं म्हटलं आहे. आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या मैदानांची क्षमता कमी असल्याचं पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दुसरीकडे आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानावर स्टेजदेखील बांधण्यात आलं आहे. पण पोलिसांनी हे स्टेज हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभू्मीवर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तर नाशिकमध्ये 8 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर असे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांनी नोटीसमध्ये काय म्हटलं आहे?
आंदोलक लाखोंच्या संख्येने मुंबईत आल्यास मुंबईची दैनंदिन व्यवस्था कोलमडणार आहे. आझाद मैदानाची क्षमता 5 ते 6 हजार असल्याने तिथे सोयी-सुविधा होणार नाहीत. त्यामुळे आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे विनापरवानगी आंदोलन केल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल. शिवाजी पार्कवर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा सरकारी पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. आंदोलनामुळे शिवाजी पार्कवरच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अडथळा निर्माण होऊ शकतो. एवढच्या मोठ्या प्रमाणात आंदोलकांना सामावून घेण्याची शिवाजी पार्क मैदानाची क्षमता नाही, असं पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.
मुंबईत आंदोलक लाखोंच्या संख्येत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबईतील सार्वजनिक सुव्यवस्था, अत्यावश्यक सेवा आणि रुगंणांची हेळसांड होऊ शकते. आंदोलन अनिश्चितकालीन असल्याने आवश्यक सोयी दीर्घकाळासाठी मुंबईत पुरवणे शक्य होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी योग्य जागा आपणास कळवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान, सेक्टर 29, खारघर नवी मुंबई हे मैदान आपल्यासाठी संयुक्तिक राहील. खारघर येथे आंदोलनासाठी आपण नवी मुंबईच्या संबंधित प्राधिकरण्याची परवानगी घ्या, असे आदेश पोलिसांनी नोटीसमधून जरांगे पाटील यांना दिले.
रोहित पवार पोलीस आयुक्तालयात
दरम्यान, मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मुंबई पोलीस आयुक्तालयात गेले. त्यांनी पोलीस आयु्क्त विवेस फणसाळकर यांना मराठा आंदोलकांना आंदोलनासाठी जागा करुन द्यावी, अशी विनंती केली आहे. “मराठा बांधव लाखोंच्या संख्येने येत आहेत, त्यांची योग्य सोय शासनाकडून होतील त्याची तयारी झाली पाहिजे. महिला येत आहेत, त्यामुळे पोलिसांची सुरक्षा असली पाहिजे, अशी विनंती केली. पण महापालिकेकडे सरकारकडून अजून कोणतीही सूचना आलेली नाही. पोलीस आयुक्तालयातून जागा बदला असं सांगण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांचे समन्वय आणि पोलीस यांच्यात चर्चा सुरु आह. तेच निर्णय घेत आहेत. पण जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो लोक येत आहेत. त्यांची सुविधा झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.