नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होणार? रोहित पवार यांनी ‘तो’ अंदाज वर्तवला
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कॅगच्या अहवालाविरोधात भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी भविष्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधान बनू शकतात, पण त्यापूर्वीच त्यांचा पत्ता कट करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात आपण पुन्हा पुढच्यावर्षी पंतप्रधान म्हणून भाषण करण्यासाठी येऊ, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या याबाबतच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधल्याची बातमी ताजी असताना आज कॅगच्या आलेल्या अहवालामुळे एकच खळबळ उडाली आहे. कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यात कोट्यवधींचा गैरप्रकार झाल्याचा दावा करण्यात आलाय. कॅगच्या याच अहवालावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट भाजपवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
“केंद्र सरकारची एकमेव जमेची बाजू आणि सर्वाधिक कार्यक्षम मंत्रालय म्हणजे नितीन गडकरी यांचं रस्ते निर्माण मंत्रालय. सध्याच्या केंद्र सरकारमधील कुठला मंत्री सर्वाधिक आवडतो? असा प्रश्न देशातल्या नागरिकांना केला तर प्रत्येकाचं उत्तर नितीन गडकरी हेच असेल, यात कुठलीही शंका नाही”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांची स्तुती केली.
‘गडकरींना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न’
“कॅग अहवालाच्या बातम्या वाचनात आल्या असल्या तरी याचा विस्तृत अभ्यास केलेला नाही. पण कॅग अहवालाच्या निमित्ताने केवळ गडकरी यांच्या विभागावर लक्ष केंद्रीत करून त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे, असं वाटतं. शेवटी मराठी माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिल्लीत होणारच आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांचं सूचक वक्तव्य?
“केंद्र सरकारच्या अपयशी कारभारामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा विजयी होणार नाही हे स्पष्ट असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास नितीन गडकरी सर्वाधिक पसंतीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच त्यांचा पत्ता कट करुन त्यांना दूर सारण्याचा तर हा कट नाही ना? अशी शंका येते”, असं रोहित पवार म्हणाले. याचा अर्थ असाच आहे की, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएलाही बहुमत मिळालं नाही तर नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत येऊ शकतं, असं रोहित पवार यांना सूचित करायचं आहे.
“असो! महाराष्ट्र भाजप नितीन गडकरी यांच्यासोबत असेल की नाही हे माहीत नाही, पण विकासाची दूरदृष्टी असलेल्या गडकरी साहेबांसोबत मराठी माणूस म्हणून मी नक्कीच उभा राहीन”, असंदेखील रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.