‘पडलेली बॉडी लँग्वेज, अस्वस्थता, आणि त्याच फायलींना मंजुरी’, महाराष्ट्राचं राजकरण पुन्हा भूकंपाने हादरणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्रातील आगामी राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण त्यांनी अगदी तसंच ट्वीट केलंय.
मुंबई : तुर्की आणि सीरिया या दोन देशांमध्ये गेल्या आठवडात भयानक मोठा भूकंप आला. या भूकंपात आतापर्यंत 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या दोन्ही देशांमध्ये प्रेतांचे अक्षरश: खच पडले आहेत. या भयानक भूकंपामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. या भूकंपानंतर एक व्हिडीओ समोर आलाय. त्या व्हिडीओत काही पक्षी कर्कश आवाजात आक्रोश करताना दिसत आहेत. त्यामुळे तेथील पशू-पक्षांना भूकंपाची चाहूल लागली होती, असं मानलं जात आहे. याच गोष्टीचा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्रातील आगामी राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील राजकारणात आगामी काळात मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचा दावा केलाय. “भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
‘आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता’
“सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती”, असा दावा रोहित पवारांनी केला.
या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती.. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं.. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं… ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 15, 2023
‘भूकंपाची चिन्ह असावीत?’
“सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?”, असा सवाल रोहित पवारांनी केलाय.
महाराष्ट्रात याआधी आठ महिन्यांपूर्वी राजकीय भूकंप आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात मोठं बंड पुकारलं होतं. ते तब्बल 50 आमदारांना घेऊन सत्तेतून बाहेर पडले होते. त्यामुळे मोठा राजकीय भूकंप आला होता.
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्यासोबत हातमिळवणी करुन नव्याने सरकार स्थापन केलं होतं. पण हे सरकार फार कार टिकणार नाही, असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो. रोहित पवार यांचं ट्विट त्याचाच एक भाग आहे.