Sadabhau Khot: राजू शेट्टींच्या हुंकार नंतर आता सदाभाऊंचं “जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा” राज्यव्यापी अभियान
Sadabhau Khot: गेली अडीच वर्ष झाली महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत.
मुंबई: राजू शेट्टी (raju shetti) यांनी बळीराजा हुंकार रॅली काढल्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे राज्यव्यापी दौरा काढणार आहेत. येत्या 29 एप्रिलपासून ते राज्यात जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा हे अभियान सुरू करणार आहेत. त्यांच्या या अभियानात त्यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) देणार आहेत. गेली अडीच वर्ष झाली महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. परंतु राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप-प्रत्यारोप व कारवाई तसेच भ्रष्टाचार यामध्ये गुंग झाले आहे. त्यामुळेच आम्ही ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरेल. यावेळी राज्य सरकारचा कारभार एक्सपोज केला जाईल, असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सदाभाऊंच्या या यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज महाराष्ट्रात लोडशेडींग, अतिरिक्त ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, वीज बिल माफी, शैक्षणिक समस्या, रखडलेल्या भरती, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, लांबलेल्या निवडणुका, बोकाळलेला भ्रष्टाचार, गँगवार, दरोडे, खून, लूट, पेट्रोल डिझेल, दरवाढ, कोरोना, अतिवृष्टी, वादळ, महापूर, दुष्काळ, रासायनिक खत टंचाई, बोगस बियाणे, वेगवेगळे प्रदूषण, शेतमाल हमीभाव व पिक विमा या खऱ्या समस्या आहेत. परंतु राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करून केवळ आरोप-प्रत्यारोप डायलॉग बाजी राजकीय विरोधकांसाठी विरोध हेच करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रयत हैरान परेशान झाली आहे. या रयतेच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेतर्फे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी रयत आक्रोश यात्रा मे महिन्यामध्ये करण्यात येणार आहे.
प्रश्न गंभीर पण सरकारचं दुर्लक्ष
विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आले आहे. कारण पंढरपूर मध्ये वीज कनेक्शन बंद केल्यामुळे एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर नगर जिल्ह्यामध्ये ऊस कारखान्याला जात नाही म्हणून एका 80 वर्षाच्या वयस्कर शेतकऱ्यांने आत्महत्या केली, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्याने सुद्धा पुणे जिल्ह्यात आत्महत्या केली आहे. असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील रयतेचे गंभीर झालेले असतानासुद्धा राज्य सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे या जनतेच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधावे यासाठी रयत क्रांती संघटना “जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा” राज्यव्यापी झंझावाती दौरा काढणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
यात्रा कुठे कुठे
29 एप्रिल- सिंधुदुर्ग 30 एप्रिल- रत्नागिरी 1 मे- कोल्हापूर 2 मे- सांगली 7 मे- सातारा 8 मे- पुणे 9 मे- नाशिक