Sanjay Raut : शिवसेना पुरस्कृत वगैरे निर्णय झाला नाही, शिवसेना उमेदवार देणारच; राऊतांच्या विधानाने संभाजी छत्रपतींचं टेन्शन वाढलं
Sanjay Raut : शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवसेना संभाजी छत्रपती यांच्या नावाला पाठिंबा देणार असल्याची आज जोरदार चर्चा होती. त्यावर संभाजी छत्रपतींकडून काही प्रतिक्रिया आली नव्हती.
मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) हे शिवसेनेचे (shivsena) राज्यसभेचे शिवसेना पुरस्कृत उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगून संभाजी छत्रपती यांचं टेन्शन वाढवलं आहे. शिवसेना पुरस्कृत असा निर्णय झाला नाही. आम्ही दुसरा उमेदवार देऊ. तो शिवसेनेचाच असेल. ही शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका आहे. त्यामुळे पुरस्कृत वगैरे असा विषयच नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता संभाजी छत्रपती शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर स्वीकारणार की राज्यसभेच्या मैदानातून माघार घेणार की निवडणुकीला सामोरे जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. शिवसेना जो उमेदवार देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ असं राष्ट्रवादीने आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय घटना घडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवसेना संभाजी छत्रपती यांच्या नावाला पाठिंबा देणार असल्याची आज जोरदार चर्चा होती. त्यावर संभाजी छत्रपतींकडून काही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही चर्चा फेटाळून लावली. शिवसेना आपला उमेदवार देईल. संभाजी छत्रपती शिवसेनेत आले तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असं राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे आमचे सरसेनापती
उद्धव ठाकरेंवर एक तरी केस आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. त्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे आमच्या पार्टीचे सेनापती आहेत. आमच्यावर जेवढ्या केसेस आहेत तेवढ्या त्यांच्या पार्टीवर नाही. त्यांच्यावर कोणत्या केसेस आहेत? असा सवाल त्यांनी केला.
कबर आज आहे का?
औरंगजेबाची कबर आज आहे का? आमच्या सरकारला दोन वर्ष झालं आहे. औरंगजेबाची कबर आजची आहे का? औरंगजेबची जी कबर आहे, ती केद्रं सरकारच्या हातात आहे. तोडून टाका ना. त्यांच्या हातामध्ये आहे ती, असं राऊत म्हणाले.
तर राजकारणात राहू नका
राणा दाम्पत्यांना लडाखमध्ये भेटलो. तो काही खासगी दौरा नव्हता. केंद्राच्या स्थायी समितीचा तो दौरा होता. अशा दौऱ्यांना जावं लागतं. तो शासकीय दौरा होता. एवढं जर समजत नसेल तर राजकारणात राहायाल नको. हवं तर केंद्र सरकारला विचारा, असं त्यांनी सांगितलं.
हे हिंदुत्वावादी एमआयएम
हे नवे हिंदुत्ववादी एमआयएम आहेत. हिंदुत्ववादी ओवैसी आहेत. ते ओवैसी आणि हे ओवैसी सेम आहेत, असं सांगतानाच मातोश्री हे मातोश्रीच आहे. याच मातोश्रीने तुम्हांला मोठं केलं आहे. सर्वांना मोठं केल आहे, असंही त्यांनी सांगितलं.