VIDEO: महाराष्ट्रातच इन्कम आणि टॅक्स आहेत काय?; संजय राऊतांचा भाजपला सवाल
शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मुंबई: शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या निवासस्थानी आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. मला वाटतं केवळ महाराष्ट्रातच इन्कम आहे आणि टॅक्स आहे. मुंबई सर्वाधिक टॅक्स केंद्र सरकारला देते. जिथे जिथे भाजपची (bjp) सत्ता आहे, त्या राज्यात इन्कमही नाही आणि टॅक्सही नाहीये. या राज्यांमध्ये सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल करतानाच महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यामुळे सेंट्रल एजन्सीला केवळ महाराष्ट्रातच काम आहे किंवा पश्चिम बंगालमध्येच काम आहे. बाकी संपूर्ण देश ओस पडला आहे. आम्ही या सर्व गोष्टी नमूद करत आहोत. जनताही पाहत आहे. जे शोधायचं आहे. शोधू द्या. ढुंढते रह जाओगे, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्रास देण्याचं काम सुरू आहे. आम्ही हा त्रास सहन करायला तयार आहोत. सर्व गोष्टी नोट करून ठेवत आहोत. मात्र, परत सांगतो, महाराष्ट्र वाकणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
उत्तर प्रदेशात परिवर्तन होतंय
यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकांवर भाष्य केलं. आम्ही उत्तर प्रदेशातून आलो. आदित्य ठाकरेही प्रचारासाठी गेले होते. उत्तर प्रदेशात परिवर्तन होत आहे. सत्ताबदल करण्याची लोकांची मानसिकता आहे. काँटे की टक्कर आहे. पण अखिलेश यादव यांनी वातावरण ढवळून काढलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात परिवर्तन होताना दिसत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपचं ढोंग सुरू आहे
भाजपने मराठी पाट्यांना विरोध केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपची भूमिका कायम दुटप्पी राहिली आहे. मराठी माणसांची आर्थिक कोंडी करायची, मराठी माणसांच्या हातात पैसा राहू नये म्हणून कारवाया करायच्या, मराठी पाट्यांना विरोध करायचा आणि मराठी कट्ट्यांसारखे कार्यक्रम सुरू करून ढोंग करायचं हे काम सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
अभिजात भाषेचा दर्जा असलेला सुवर्ण मुकुट चढवा
मराठी भाषेच्या डोक्यावर अभिजात भाषेचा दर्जा असलेला सुवर्ण मुकुट चढवा. महाराष्ट्राच्या जनतेने आणि जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी माणसाने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. भाषेवरील अन्याय कुणीही सहन करू नये, असं ही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
IND vs SL: इशान किशन रुग्णालयात दाखलं, डोक्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं, मैदानावर काय घडलं, पहा VIDEO