Sanjay Raut : ना शिंदे, ना फडणवीस, ना अजितदादा… सरकार कुणी आणलं?; संजय राऊत यांनी घेतलं वेगळंच नाव
कोरोना काळात तुम्ही काय चिंचोक्या मोजत होता का? हे 50 खोके आले कुठून? लुईसवाडीत झाडे लागली की साताऱ्याला दरे गावात झाडे लागलीत? कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम केलं. जगाने आम्हाला गौरवलंय, असं संजय राऊत म्हणाले.
गणेश थोरात, टीव्ही9 मराठी, प्रतिनिधी मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात नवं सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आलं. शिंदे यांनी आपल्यासोबत यावं म्हणून त्याला भाजपची फूस होती. शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मध्यरात्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटी होत होत्या. त्यामुळे राज्यात नवं समीकरण घडवून आणण्यामागे देवेंद्र फडणवीसही होते, अशीच चर्चा सध्या राज्यात आहे. पण या चर्चांना कलाटणी देणारं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी वेगळीच माहिती दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगळाच दावा केला आहे. महाराष्ट्रातलं सरकार काय एकनाथ शिंदेंनी आणलंय? अजित पवारांनी आणलंय? की देवेंद्र फडणवीस यांनी? हे सरकार ना शिंदेंनी आणलंय. ना अजितदादांनी, ना फडणवीस यांनी. हे सरकार दिल्लीतून ईडीने आणलंय, सीबीआयने आणलंय आणि इन्कम टॅक्सने आणलंय, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार यांनी सांगितलं ना अजितदादा का पळाले? घाबरून पळाले. या सरकारच्या चड्डीची नाडी दिल्लीत आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या म्हणणार नाही. कारण ते बेल्ट वापरतात. पण सरकारची नाडी दिल्लीत आहे, असा हल्लाही राऊत यांनी चढवला.
फडणवीस मदारी
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली. फडणवीस मदारी झाले आहेत. हे दोघे माकडं आहेत. फडणवीस डमरू वाजवत आहेत. डम डम डम डम… हे दोघे नाचत आहेत. त्यांच्या हातात काय आहे? सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीत आहे. त्यामुळे तर त्यांना वारंवार जावं लागतं, अशी टीका त्यांनी केली.
सोमय्यांची मिमिक्री
यावेळी राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची मिमिक्री केली. हसन मुश्रीफ तर देलमध्येच जातील. त्याला सगले पातवणार होते ना. मग तो देलमध्ये गेला नाही, मंत्रिमंडळात गेला ना, अशी मिमिक्री करत राऊत यांनी सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला.
हसन मुश्रीफ यांना तुरुंगात टाकायला कोण निघालं होतं? भाजपवाले ना? आणि त्यांचा तो नागडा. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले तेच लोक आज भाजपसोबत येऊन उच्च पदावर आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.