सुरज परमार यांच्या ‘त्या’ डायरीतील नावे कुणाची? एसआयटी चौकशी लावा; संजय राऊत यांचं सरकारला आव्हान
दिशा सालियन प्रकरण इंटरपोलकडे जरी दिलं तरी हरकत नाही. ज्या विषयाशी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही ते महाराष्ट्रच्या विधानसभेत का काढले जातायत?
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: ठाकरे गटाने ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येचा मुद्दा लावून धरला आहे. खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. सुरज परमार यांची डायरी सापडली आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत. ही नावे कुणाची आहेत हे आम्हाला माहीत आहे. हिंमत असेल तर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावा, असं आव्हानच संजय राऊत यांनी सरकारला दिलं आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिलं.
काल आमच्या अरविंद सावंत यांनी एक विषय मांडला. ठाण्यातीरल बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर एक डायरी सापडली आहे. त्या डायरीत जी काही सांकेतिक नावं आहेत. कुणाची आहेत आम्हाला माहीत आहेत. लावा याची एसआयटी, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं.
एसआयटी सुरज परमारच्या डायरीवर व्हायला पाहिजे. करणार का? नाही. एसआयटी फक्त आमच्यावर होते. इतकं सूडबुद्धीने वागणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात आलं नव्हतं, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीत जातात. त्यावरूनही राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. शिंद-फडणवीस यांचं हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागत असेल. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख तिकडे आहेत. ते जातील. त्यांना तिथूनच आदेश घ्यावे लागतात, असा चिमटा त्यांनी काढला.
दिशा सालियन प्रकरण इंटरपोलकडे जरी दिलं तरी हरकत नाही. ज्या विषयाशी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही ते महाराष्ट्रच्या विधानसभेत का काढले जातायत?, असा सवाल त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या अपमानावरून महाराष्ट्र पेटलेला आहे. त्याचे पडसाद सभागृहात उमटणार होते. पण त्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीच अनावश्यक मुद्दे काढले जात आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.