कोश्यारी यांना बदललं म्हणजे महाराष्ट्रावर उपकार नाही; संजय राऊत यांनी केंद्र सरकारला सुनावलं
राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारसी नाकारण्यात आल्या. 12 सदस्य विधानपरिषदेवर नियुक्त केले नाहीत. या नियुक्त्या त्यांनी घटनेनुसार मान्य करायला हव्या होत्या.
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अखेर राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील 13 राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याच्या निर्णयाचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. तसेच हे स्वागत करतानाच केंद्र सरकारवर टीकाही केली आहे. कोश्यारी यांना बदललं म्हणजे महाराष्ट्रावर उपकार केलेले नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
कधी नव्हे तर राज्यपालांच्या विरोधात जनतेने, राजकीय पक्षांनी, राज्यातल्या संघटनांनी भूमिका घेतली होती. राज्यपालांच्या विरोधात पहिल्यांदाच लोकं रस्त्यावर उतरले होते. राज्यपालांनी भाजपचे एजंट म्हणून काम पाहिलं ते घटनाबाह्य होतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
तर कोश्यारी होतो
राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारसी नाकारण्यात आल्या. 12 सदस्य विधानपरिषदेवर नियुक्त केले नाहीत. या नियुक्त्या त्यांनी घटनेनुसार मान्य करायला हव्या होत्या.
पण मी राज्यपालांना दोष देणार नाही. ते केंद्राच्या दबावाखाली होते. व्यक्ती ही वाईट नसते. पण जेव्हा व्यक्ती दबावाखाली काम करते तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो, असा टोला त्यांनी लगावला.
तात्काळ हटवायला हवं होतं
राज्यपाल बदलण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा त्यांनी अवमान केला. त्यानंतर त्यांना तात्काळ हटवायला हवं होतं. पण केंद्राने ते केलं नाही. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला. सामुदायिक बदल्या केल्या त्यात त्यांचं नाव टाकलं. महाराष्ट्रातील शिवप्रेमींवर उपकार केले असं मानणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावले.
इतिहासात नोंद राहील
राज्याच्या लोकांचा आवाज ऐकला असता तर त्यांची तात्काळ बदली केली असती. पण शेवटपर्यंत त्यांची बदली केली नाही. ही काही मेहरबानी नाही. भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला पाठिशी घातले. याची इतिहासात नोंद राहील, असं ते म्हणाले.
महाराष्ट्राचा विजय झाला
शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी झाली. राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांनी राज्यपालांचा राजीनामा मंजूर करून तमाम शिवप्रेमींच्या भावनांचा आदर केला. संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपालांची हकालपट्टी झाल्याबद्दल सर्व शिवप्रेमींचे मी अभिनंदन करतो.
महाराष्ट्रातून राज्यपालांची हकालपट्टी व्हावी म्हणून तमाम जाती धर्माच्या पुणेकरांच्या वतीने आम्ही ‘पुणे बंद’ केलं होतं. त्या तमाम पुणेकरांचा आज विजय झाला, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केली.