उद्धव ठाकरे यांनी शिंदे पितापुत्राचे फाजील लाड केले, संजय राऊत असं का म्हणाले?; चर्चा तर होणारच
युतीत भाजपने प्रत्येकवेळी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या जागा जागा वाटपात कशा कमी होतील आणि जागा वाटप झाल्यावर आमचे उमेदवार कसे पाडले जातील हे सतत पाहिलं. हे सर्व हिंदुत्वाच्या नावाने आम्ही सहन केलं.
मुंबई : कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये तू तू मै मै सुरू झाली आहे. या मतदारसंघातील खासदार आणि शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी तर खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराच भाजपला दिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले असून भाजप शिंदे गटावर कुरघोडी करत असल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खरं तर श्रीकांत शिंदे यांचा शिवसेनेशी काहीच संबंध नव्हता. त्यांनी कोणतंही पक्ष कार्य केलं नव्हतं. तरीही उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेंना तिकीट दिलं. त्यांना दोनदा निवडून आणलं. शिंदे पितापुत्रांचे उद्धव ठाकरे यांनी फाजील लाडच केले, अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनेशी कोणताही संबंध नसताना, पक्ष कार्याशी कोणताही संबंध नसताना श्रीकांत शिंदे यांना दिली गेली. त्यासाठी गोपाळ लांडगे यांची दिलेली उमेदवारी मागे घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा हे लाड केले होते. शिंदे पुत्राचे हे फाजील लाड होते. श्रीकांत शिंदेंना दोनदा तिकीट देऊन दोनदा निवडून आणलं. आता त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. प्रत्येक जागेसाठी भाजप त्यांना रडवल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
आता कळेल त्यांना
शिंदे गट आता भाजप सोबत आहे. त्यांनी वेगळा गट तयार केला आहे. भाजपकडे गुलामी करत आहे. 25 वर्ष आमची त्यांच्याशी युती होती. तेव्हा प्रत्येक निवडणुकीत भाजपचे नेते आमच्यासोबत जागेसाठी संघर्ष करायचे. आमचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करत होते. आमच्या उमेदवारांच्या मतदारसंघात बंड करायचे. तरीही आम्ही नातं निभावलं. आता त्यांना निभावू द्या. आता त्यांना माहीत पडेल. शिवसेना कोणत्या संघर्षातून जात होती. आम्ही भाजपशी नातं का तोडलं हे त्यांना आता कळेल, असा टोला राऊत यांनी लगावला.
त्यांचं ते पाहून घेतील
आनंद दिघे हे आमचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. त्यावेळी कल्याणची सीट आम्ही खेचून घेतली होती. आमचा गड आहे. आम्ही लढणार असं म्हणून भाजपकडून ती जागा घेतली होती. पूर्वी तिथे भाजपकडून राम कापसे निवडणूक लढायचे. पण शिवसेनेने ही जागा घेतली आणि निरंतर आम्ही जिंकत आलो. आता शिंदे यांचे चिरंजीव खासदार आहेत. तरीही भाजपने त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. तुम्हाला सीट मिळणार नाही असं सांगत आहे. आता ते दोघे पाहून घेतील. परंतु आता प्रत्येक सीटवर त्यांचा असाच संघर्ष होईल, असा दावा त्यांनी केला.
म्हणून शाह महाराष्ट्रात
आमची भूमिका स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना काम करत आहे. आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. नेते काम करत आहेत. भाजपचे नेते कमजोर पडल्याने दिल्लीतून नेत्यांना यावं लागतं. केवळ शिवसेनेचं आव्हान आहे, म्हणूनच दिल्लीतून भाजपचे नेते येत आहेत. केवळ शिवसेनेचं आव्हान म्हणूनच, असा टोलाही त्यांनी लगावला.