राज्यातील प्रत्येक मतदार संघात 10 हजार बोगस मतदार…असे षडयंत्र केले…मविआ नेत्यांचा मोठा आरोप
sanjay raut and nana patol: मूळ मतदारांची नावे कापून इतर राज्यातील लोकांची नावे जोडली गेली आहे. महायुतीच्या या षडयंत्रात राज्यातील काही अधिकारी सहभागी आहेत. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला आम्ही माहिती दिली.
राज्यातील प्रत्येक मतदार संघात दहा हजार मतांची फेरफार सुरु आहे. या षडयंत्रामागे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेआहे. मूळ मतदारांची नावे कापून इतर राज्यातील लोकांची नावे जोडली गेली आहे. महायुतीच्या या षडयंत्रात राज्यातील काही अधिकारी सहभागी आहेत. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला आम्ही माहिती दिली. आता मुख्य निवडणूक आयोगाला ईमेल करत आहोत, असे शिवसेना उबाठा नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
संजय राऊत यांचा मोठा आरोप
संजय राऊत म्हणाले, संविधानाने निवडणूक आयोगाला निष्पक्ष निवडणुका घेण्याचे अधिकार दिले आहे. त्याचं कसं उल्लंघन सुरू आहे, हे समोर दिसून येत आहे. महायुतीला पराभव दिसत आहे. त्यामुळे ते घाबरले आहेत. निवडणुकीत जिंकू शकत नाही, आपण सत्ता गमावतोय या भीतीने देशाचे गृहमंत्री अमित शाह, गृहखात्याच्या अंतर्गत निवडणूक आयोग आहे, त्यांनी एक मोठं कारस्थान केलं आहे. लोकशाही विरोधात केलं आहे, त्याची तक्रार घेऊन कालच महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोगाला भेटले आहे.
मतदार यादीत गोंधळ निर्माण करण्याचं षडयंत्र उघड झालं आहे. प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघात भाजपची टीम कामाला लागली आहे. त्याचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत असं दिसतं. हा तांत्रिक मुद्दा असला तरी राज्याच्या भविष्याचा मुद्दा आहे. एवढंच सांगेल हे षडयंत्र उधळू आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करू. वेळ पडली तर विराट मोर्चा आयोगावर काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
नाना पटोले यांचा आरोप
महायुतीला हरण्याच्या भीतीमुळे मूळ मतदारांचं नाव कमी केली गेली आहे. राज्यातील मतदारांचं नाव काढून टाकलं जात आहे. बाहेरच्या राज्यातील छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील मतदारांचं आधारकार्ड जोडून १० – १० हजार लोकांची नावे नोंदवले जात आहे. ओरिजनल मतदार हटवले जात आहे. राज्यातील अधिकारी यात सहभागी झाले आहेत. आयोगाला आम्ही माहिती दिली. आज आम्ही मेल करत आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
झारखंडच्या डीजीची बदली होत असते पण राज्यातील डीजीची बदली करताना अधिकार नाही म्हणून निवडणूक आयोग सांगतो. म्हणजे आयोग मोदींच्या पायाजवळ बसला आहे का? हा प्रश्न आहे. निवडणूक आयोगच पारदर्शक नसेल राज्यातील लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आयोगाकडून होत असेल तर कदापी सहन केलं जात नाही. भाजप सत्तेच्या आधारे लोकशाहीचा गळा घोटणार असेल तर जनता खपवून घेणार नाही. आम्ही मेल करणार आहोत. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आयोगाने थांबवलं पाहिजे.