महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला; संजय राऊत यांनी सांगितला प्लान
मुंबईत येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरमध्ये इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीला अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, भगवंत मान, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, हेमंत सोरेन आदी सहा मुख्यमंत्री येणार आहेत.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने नवा प्लान तयार केला आहे. नव्या सूत्रानुसार ही आघाडी निवडणूक लढणार आहे. त्यामुळे महायुतीला मोठं आव्हान उभं राहणार आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या या प्लानची माहिती दिली. तसेच आमच्यात जागा वाटपावरून कोणतीही कुरबुर होणार नाही. आम्ही जिंकण्यासाठी तडजोड करायलाही तयार आहोत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
महाविकास आघाडी मजबूत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी आहे. तिन्ही पक्षाची आघाडी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढणार आहे. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोडी करावी लागणार आहे. ते करण्यासाठी आमची तयारी आहे. तिन्ही प्रमुख नेत्यांनी ठरवलंय, जागा वाटपावरून मतभेद उघड करायचे नाहीत. जागेचा हट्ट धरायचा नाही. निवडणूक लढवायची आणि जिंकायची आहे. जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
आव्हान स्वीकारलंय
इंडिया आघाडीच्या बैठकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होणं याला महत्त्व आहे. पाटण्यात आधी बैठक झाली. तिथे नितीश कुमार यांची सत्ता आहे. बंगळुरूत काँग्रेसची सत्ता होती. तिथेही आमची बैठक झाली. पण महाराष्ट्रात सत्ता नसताना बैठक घेत आहोत. सत्तेशिवाय आम्ही बैठक घेत आहोत. सत्तेशिवाय बैठक घेणं हे आव्हान आहे. हे आव्हान आम्ही स्वीकारलं आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
सहा मुख्यमंत्री येणार
इंडिया आघाडीच्या बैठकीला सहा मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, भगवंत मान, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, हेमंत सोरेन आदी सहा मुख्यमंत्री बैठकीला येत आहेत. तेजस्वी यादव, लालू यादव, फारूख अब्दुल्ला, सीताराम येचुरी, ओमर अब्दुल्ला आदी बडे नेतेही येत आहेत. अनेक महत्त्वाचे नेते आहेत. ही बैठक अत्यंत यशस्वी होणार आहे, असा दावाही त्यांनी केला.