‘तो’ चरण स्पर्श की गुडघा स्पर्श?; संजय राऊत यांनी भाजपला डिवचले
जयंत पाटील यांना ईडीचं समन्स आलेलं आहे आणि त्याला ते सामोरे जात आहेत. हे राजकीय दबावाचे एक षडयंत्र आहे. जयंत पाटील हे स्वाभिमानी नेते आहेत. त्यांनी ताठमानेने यंत्रणेला सामोरे गेले पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरण स्पर्श केले. त्याचे फोटोही व्हायरल झाले आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मोदींना संपूर्ण जग आदर देत असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा चरण स्पर्श आहे की गुडघा स्पर्श? असा सवाल करतानाच तुम्ही फोटो नीट आणि निरखून पाहा. तुम्हाला दिसून येईल, असं संजय राऊत म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या समोर आले तर त्यांना आम्हीही वाकून नमस्कार करू. ते आमच्या पेक्षा वयाने मोठे आहेत, असंही राऊत म्हणाले. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
पापुआ न्यू गिनी या देशाची लोकसंख्या 60 लाख आहे. त्या देशात 850 भाषा आहेत. तो संपूर्ण आदिवासी भाग आहे. मागास भाग आहे. ज्या पंतप्रधानांनी मोदींना चरण स्पर्श केला, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होते. भ्रष्टाचार करणारे ते अर्थमंत्री होते. फरारही होते. त्यांनी चरणस्पर्श केला आनंदाची गोष्ट आहे. अंधश्रद्धा, भूतप्रेत आणि जादूटोणा यामुळे तो देश प्रसिद्ध आहे. त्यांनी नमस्कार केला असेल आणि भाजपवाले डंका पिटत असेल तर त्यांना माझा नमस्कार आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला. गुवाहीटीत गेलेल्यांनी तिकडे जायला हवं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
याद्या तयार करू
जयंतराव पाटील मजबूत नेते आहेत. स्वाभिमानी नेते आहेत. त्यांनी ताठमानेने चौकशीला सामोरे गेले पाहिजे. हे चित्र फार काळ टिकणार नाही. 2024ला ईडीच्या कार्यालयात कुणाला पाठवायचं आणि कितीवेळ बसवायचं याच्या याद्या आम्ही तयार करू, असा इशारा त्यांनी दिला.
संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतीच्या हस्तेच व्हावं
राष्ट्रपतीच्या हस्ते संसद भवनाचं उद्घाटन व्हावं. राष्ट्रपती सर्वोच्च आहे. मोदी आणि शाह हे त्यांना मानत नाही ते जाऊ द्या. संसदेचे कस्टोडियन आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात. ते सरकारला शपथ देतात. त्यांच्या भाषणाने संसदेचं अधिवेशन सुरू होतं. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेचं उद्घाटन व्हावं असं कोणाचं म्हणणं असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.