बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यामागे राजकारण; संजय राऊत यांनी ऐकवला राजशिष्टाचार
दावोस हा जागतिक मेळावा असतो. तिथे अनेक करार मदार होतात. 88 हजार कोटींच्या विटा रचल्या जातील तेव्हा पाहू. मुख्यमंत्री कुणाला भेटले याचा हिशोब पाहू.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात येणार आहे. या सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका छापण्यात आली आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचं या कार्यक्रम पत्रिकेत नाव छापण्यात आलेलं नाही. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना या सोहळ्याचं निमंत्रणही देण्यात आलेलं नाही. त्यामुळे ठाकरे गटामधून संताप व्यक्त केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यामागे राजकारण आहे. राज्यात बाप चोरणारी टोळी सक्रिय झालीय हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केली.
प्रोटोकॉल असतो. राजशिष्टाचार असतो. आपण बाळासाहेब ठाकरे त्यांचं तैलचित्रं लावतोय. त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री होते. त्यांना सन्मानाने बोलावत नाहीत. म्हणजे तुम्ही राजकारण करत आहात. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, राज्यात बाप पळवणारी टोळी आली आहे. त्यात तथ्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना प्रमुखांचे तैलचित्रं लावताय आणि त्यांच्या चिरंजीवांना आमंत्रण नाही. सावरकरांचं तैलचित्रं लावलं तेव्हा त्यांच्या नातेवाईकांचं निमंत्रण पत्रिकेवर नाव छापलं होतं. ही परंपरा आहे. हा शिष्टाचार आहे.
पण आपल्याकडे परंपरा पाळल्या जात नाहीत. या तैलचित्र लावण्यामागे काही राजकारण आहे असं वाटतं. महाराष्ट्रात सूड आणि बदला घेण्याचं राजकारण सुरू आहे. हे निश्चित आहे, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस सूड घेत असतील असं वाटत नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
दावोस हा जागतिक मेळावा असतो. तिथे अनेक करार मदार होतात. 88 हजार कोटींच्या विटा रचल्या जातील तेव्हा पाहू. मुख्यमंत्री कुणाला भेटले याचा हिशोब पाहू. उद्या पंतप्रधान मुंबईत येत आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती करावी.
अडीच लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्रातून पळून नेले ते आम्हाला परत द्या, एवढं जरी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितलं तर महाराष्ट्रावर उपकार होतील. दावोसच्या उद्योगाचे नंतर पाहू, असा टोला त्यांनी लगावला.