भाजपला पराभवाची भीती, किती मंत्र्यांचा मतदारसंघात ठिय्या?; संजय राऊत यांनी आकडाच सांगितला
शिंदे गटाच्या कार्यकारिणीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव झाला आहे. महाशक्तीचं केंद्रात सरकार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देताना ही महाशक्ती हात आखडते का घेते?
मुंबई : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. सरकारचे पाच ते सहा मंत्री प्रत्येक मतदारसंघात होते. या मंत्र्यांना दोन्ही मतदारसंघात तळ ठोकून ठेवण्याची काही गरज होती का? मंत्र्यांचं मतदारसंघात तळ ठोकणं म्हणजे प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न असतो. पराभवाची भीती असल्यावर भाजपकडून गोंधळ घालण्यास सुरुवात होत असते, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आता निवडणूक सुरू झालीय. पुणे आहे ते. पुण्याच्या पद्धतीनेच मतदान होईल. आज रविवार आहे. त्यात पुणे आहे. पुणेकर एकदा उतरले तर मोठ्या रांगा दिसल्याशिवाय राहणार नाही. दोन निवडणुका आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये. संध्याकाळपर्यंत अधिकाधिक मतदार मतदान करतील. पुण्यातील लोक आरामशीर बाहेर पडतात. लोकांमध्ये उत्साह आहे. मोठ्या प्रमाणावर मतदान करतील. चिंचवड आणि कसब्यात मोठा उत्साह दिसला. त्यामुळे पुणेकर घऱी बसणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
हिंदुत्ववादी असल्याचं सिद्ध करा
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली. सावरकारांबाबत वाद असण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात आणि केंद्रात सावरकरांच्या विचाराचं सरकार आहे. तसं सांगितलं जातं. पण सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली तर भाजपच्या तोंडाला फेस येतो, अशी टीका राऊत यांनी केली.
सावरकर या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतीकारक होते. महाराष्ट्राचे सुपूत्र आणि महान नेते होते. त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. ते हिंदूहृदयसम्राट होते. त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची प्रेरणा घेतली. पण काही लोकांना सावरकर फक्त मतांसाठी आणि राजकारणासाठी हवे आहेत. सावरकरांचा अपमान काही लोक करत असतात. त्याला उत्तर द्यायचं असेल तर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारने त्यांना भारतरत्न द्यावा. सावरकरांना भारतरत्न देऊन हिंदुत्ववादी असल्याचं सिद्ध करावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.
महाशक्ती हात आखडता का घेते?
शिंदे गटाच्या कार्यकारिणीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव झाला आहे. महाशक्तीचं केंद्रात सरकार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देताना ही महाशक्ती हात आखडते का घेते? आम्ही मराठी भाषेसाठी अनेक वर्षापासून झटत आहोत. गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र आणि मराठीवर दिल्लीचं आक्रमण सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
ते भाजप, ओवैसीलाच शोभतं
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रामशामची जोडी म्हणत अवहेलना केली. त्यावरही राऊत यांनी उत्तर दिलं. रामशामची जोडी तर भाजप आणि ओवैसी आहेत. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. मतदान कापणारी मशीन आहे. जिथे भाजपला गरज असते तिथे ओवैसी पोहोचतात. त्यामुळे रामशामची जोडी हे ओवैसी आणि भाजपलाच शोभतं, असा टोला त्यांनी लगावला.