महाविकास आघाडीच्या बैठकीत काय ठरलं? भाजप विरोधातील लढ्याचा प्लॅन काय?; संजय राऊत यांनी सांगितली स्ट्रॅटेजी
कसब्याचा निकालात दिसलं कोण कुठं गेलं ते. मतदार कुठे गेला हे दिसलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या पक्षाची अधोगती कशी झाली याचा अभ्यास करावा.
मुंबई : कसब्यातील विजयानंतर महाविकास आघाडीची काल महत्त्वाची बैठक पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते अजित पवारही उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या बैठकीची माहिती दिली. या बैठकीत भाजपला पराभूत करण्यासाठी महत्त्वाची स्ट्रॅटेजी ठरवण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
कालच संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या बैठकीत आम्ही सर्वांनी काही भूमिका आणि निर्णय ठरवले आहेत. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित मजबुतीने लढायची आणि भाजपला त्यांची जागा दाखवायची, असं कालच्या बैठकीत ठरलं आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
बावनकुळे आल्यापासून अधोगती
कसब्याचा निकालात दिसलं कोण कुठं गेलं ते. मतदार कुठे गेला हे दिसलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या पक्षाची अधोगती कशी झाली याचा अभ्यास करावा. त्यांच्या नेतृत्वाखालील सर्व विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. 30 वर्षांपासूनची कसब्याची जागाही त्यांना जिंकता आली नाही. चिंचवडची जागा थोडक्यात त्यांना मिळाली, नाही तर तिथेही पराभव ठरलेला होताच, असा टोला राऊत यांनी लगावला.
हा डरपोकपणा आहे
राज्य सरकार निवडणुका घेत नसल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. हा डरपोकपणा आहे. आम्ही रोज सांगतो निवडणुका घ्या. निवडणुका घ्या असं विरोधी पक्ष कधीच सांगत नाहीत. पण आम्ही सांगतो निवडणुका घ्या. पण ते घेत नाहीत. शिवसेना कुणाची आणि महाराष्ट्र कुणाचा हा फैसला होऊन जाऊ द्या. शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा त्यांचे केंद्रातील मायबाप असतील हे निवडणुका लावायला तयार नाहीत. एवढं भेदरट राजकारण गेल्या अनेक वर्षात आम्ही पाहिलं नाही. डरपोक राजकारण म्हणतात याला, असा हल्ला त्यांनी चढवला.
प्रत्येक तहसील कार्यालयावर आंदोलन करणार
शिवजयंती महोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवरायांच्या विचारानेच आम्ही आपली पावलं टाकत आली. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने शिवशाही राबवली त्याच पद्धतीने आम्ही काम करत आहोत. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. हाहा:कार उडाला आहे. शिवसेना तहसील कार्यालयावर जाऊन आंदोलन करत आहे. पंचनामे करा नाही तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असं सांगतानाच प्रत्येक तहसील कार्यालयावर जाऊन आम्ही आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.