चार दिवसातच युतीत ठिणगी?, संजय राऊत म्हणतात, प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ विधानाशी सहमत नाही
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना काही सल्ला दिला. महाविकास आघाडीत एकत्र काम करत आहेत. तर भूतकाळातील मतभेद दूर ठेवले पाहिजे.
मुंबई: प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची चार दिवसांपूर्वीच युती झाली. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता समोर आली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंबेडकर यांचा हा आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप गंभीर आहे. पण आम्ही त्यांच्या विधानाशी सहमत नाही. आंबेडकर यांनी जुन्या गोष्टी विसरून आघाडी मजबूत करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी आंबेडकर यांना फटकारले आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाही. चार दिवसांपूर्वीच आमची युती झाली. आंबेडकर भवनात युतीची घोषणा केली. प्राथमिक चर्चेत सध्या तरी शिवसेना आणि वंचित अशी चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांबद्दल अशा पद्धतीने विधानं करणं हे अजिबात मान्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवार हे देशाचे उत्तुंग नेते आहेत. शरद पवार हे भाजपचे आहेत, असं म्हणणं हा त्यांच्या कारकिर्दीवरील मोठा आरोप आहे. ते भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपचं सरकार दूर ठेवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येऊ दिलं नसतं, असं राऊत म्हणाले.
शब्द जपून वापरा
शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो. पवारच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम करतात. अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांचा सल्ला
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना काही सल्ला दिला. महाविकास आघाडीत एकत्र काम करत आहेत. तर भूतकाळातील मतभेद दूर ठेवले पाहिजे, भक्कम आघाडी उभारली पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी त्यांना सांगितलं होतं, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राहुल गांधींशी चर्चा
वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबतचा प्रस्ताव आलेला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर, राहुल गांधींशी त्या विषयावर चर्चा झाली आहे, अस म्हणत राऊत यांनी पटोले यांना फटकारले.
चिंचवड आम्ही लढू
चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कितावेळा बोलायचं? दोन जागा आहेत. आघाडीतील प्रत्येक घटकाला निवडणूक लढवायची आहे. आमचा आग्रह आहे चिंचवडसाठी आहे.
आम्ही अजित पवार यांना आमची भूमिका सांगितली आहे. चिंचवडची जागा आम्ही लढू. कसब्याच्या जागेबाबत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा, असं आम्ही राष्ट्रवादीला कळवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
म्हणून आव्हाड आले
ठाण्यातील कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे माजी मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड आले असतील. आव्हाड हे ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळे आले होते. आव्हाड यांना कोरोना झाला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांची काळजी घेतली होती. त्या भावनेतून ते आले होते. तसं आव्हाड यांनीही स्पष्ट केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.