Sanjay Raut: बुस्टर डोस माहीत नाही, पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल; राऊतांचा भाजपला टोला
Sanjay Raut: आजच्या सभेचं व्यासपीठ पाहाल तर इतकं मोठं व्यासपीठ मुंबईत निर्माण झालं नव्हतं. भव्य असं व्यासपीठ आहे. शिवसेनेचा कारभार भव्य असतो.
मुंबई: महाराष्ट्रातील, देशातील वातावरण आणि वातावरणावर आलेलं मळभ, धुकं, गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या (cm uddhav thackeray) भाषणाने दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचाच धनुष्य दिसेल. अर्थात हे राज्य आणि शिवसेना (shivsena) पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहे. शिवसेनाप्रमुखांची प्रेरणा आहे. काही लोकं राज्य बिघडणवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अडथळे निर्माण करत आहेत. ही पोटदुखी आहे, जळजळ आहे त्यावर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असं सांगतानाच कोणाचा बुस्टर डोस माहीत नाही. पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल. आमची फटकेबाजी असते. प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हे विधान केलं.
आजच्या सभेचं व्यासपीठ पाहाल तर इतकं मोठं व्यासपीठ मुंबईत निर्माण झालं नव्हतं. भव्य असं व्यासपीठ आहे. शिवसेनेचा कारभार भव्य असतो. मैदानात उतरण्याच्या निश्चियाने, जिद्दीने उतरण्यासाठी सभेचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची शिवसैनिक वाट पाहत होते. दोन वर्षात उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संवाद साधला. बैठका घेतल्या. पण विराट सभा प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहे. शिवसेना आणि गर्दी याचं नातं आहे. समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेबांचा विचार, राज्याचा विचार, विकासाचा विचार या विचाराचं लोहचुंबक आहे. त्यामुळे लोकं आपोआप जमतात. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्राला आणि देशाला आहे. या सभेतून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल, असं राऊत म्हणाले.
करारा जवाब देणार
अडीच वर्षानंतर सभा होत आहे. संपूर्ण देश त्यांचे विचार ऐकू इच्छितो. ऐतिहासिक आणि क्रांतीकारी रॅली होईल. काही लोक राज्याची अशांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना उद्धव ठाकरे करारा जवाब देणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बाळासाहेब ठाकरेच हिंदू हृदयसम्राट
हिंदू जननायक वगैरे काही नाही. असे प्रश्न अजिबात निर्माण झाले नाही. आम्ही हिंदूचं संघटन करतोय. हिंदू जननायक कोण हे प्रश्नच उभे राहू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदय स्रमाट राहतील. त्या पलिकडे कोणी नाही. इतरही नाही, असंही त्यांनी सांगितलं.