शरद पवार काय मेणाचा पुतळा आहे काय?; संजय राऊत यांचा अजितदादा गटाला संतप्त सवाल का?
अजितदादा गटाने राष्ट्रवादीवर दावा सांगितला आहे. शरद पवार निवडणूक आयोगासमोर उपस्थित असतानाच अजितदादा गटाने हा दावा केला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी अजितदादा गटाला चांगलंच फटाकरलं आहे.
गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने राष्ट्रवादीवर दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे संस्थापक, अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक आयोगासमोर बसलेले असतानाच अजितदादा गटाकडून हा दावा करण्यात आला आहे. अजितदादा गटाच्या या कृतीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. शरद पवार निवडणूक आयोगासमोर बसलेले असतानाच तुम्ही पक्षावर दावा सांगता. मग समोर बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा आहे काय? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
शरद पवार हयात आहेत. निवडणूक आयोगाच्या समोर पवार बसले होते. अन् प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार म्हणतात आमचा राष्ट्रवादी खरा. मग तिकडे बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते काय?. निवडणूक आयोगालाही काही वाटलं पाहिजे. समोर पक्षाचा अधय्क्ष बसला आहे. अन् पक्षावर कोण तरी दावा सांगतो. हे प्रकार भाजपने सुरू केले आहेत. या देशाची लोकशाही घटना खड्ड्यात घालणारे हे पक्ष आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
लोक त्यांना हसतात
बाळासाहेबांनाही विठ्ठल विठ्ठल सांगून पक्ष फोडले. भाजपने फोडा, झोडा आणि राज्य करा ही नवी नीती देशाच्या राजकारणात आणली आहे. घर फोडायचे, पक्ष फोडायचे प्रकार सुरू आहे. शिवसेना फोडली. काँग्रेस फोडली. समाजवादी पार्टी फोडण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही किती पक्ष फोडले तरी मूळ विचार मूळ पक्षाकडे असतो. जेव्हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हटलं जातं तेव्हा लोकं हसतात. अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणतात तेव्हा लोक वेड्यात काढतात. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांची आहे, असं संजय राऊत म्हणाले.
महापालिकेच्याही निवडणुका घ्या
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये आम्ही जिंकलो होतो. तेलंगनाही आम्ही शंभर टक्के जिंकू. पाचही राज्यात वेळेत निवडणुका व्हाव्यात. या निवडणुका जाहीर करताना आयोगाला एक आवाहन आहे. मुंबई महापालिकेसह 14 महापालिकेच्या निवडणुका जाहीर करा. या निवडणुका कधी जाहीर करता? 14 महापालिकेवर प्रशासक नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. अनागोंदी सुरू आहे. त्यावर निर्णय घ्या, असं आवाहनच राऊत यांनी केलं.