संघाला कोण विचारतंय?, मोदी यांची शिकार झालीय?; संजय राऊत असं काय म्हणाले?
आदीपुरुष सिनेमातून इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपला घेरलं आहे. आता हिंदुत्व धोक्यात नाही का? कुठे आहेत हंगामा करणारे. तुमचं हिंदुत्व नकली आणि ढोंगी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मुंबई : मणिपूरमध्ये प्रचंड हिंसा भडकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेडिओवर मन की बात सुरू होती. मणिपूरमधील जनतेने चौकात येऊन हा रेडिओच फोडून संताप व्यक्त केला आहे. यावरून मणिपूरमधील जनतेच्या मनात किती संताप खदखदतोय हे दिसून येत आहे. या सर्व मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतानाच संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.
मणिपूरमध्ये मन की बात सुरू असताना रेडिओ फोडला ती देशाची भावना आहे. तुमची मन की बात वेगळी आहे. देशाची वेगळी आहे. मणिपूरच्या जनतेने ते दाखवून दिलं आहे. लोक रेडिओ फोडत आहेत. ही लोकांची मन की बात आहे. ती मोदींची मन की बात नाही. मोदींची मन की बात लोकांना ऐकायची नाहीये, असं संजय राऊत म्हणाले.
मणिपूरमध्ये फेल का गेला?
मणिपूरमधील जनतेशी संवाद साधला पाहिजे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी संघाला कोण विचारतंय? असा संतप्त सवाल केला. तुम्हाला वाटतं तर जा चर्चा करा तिथल्या लोकांशी. नॉर्थ ईस्टमध्ये तुमचं मोठं संघटन आहे. मग तुम्ही फेल कसे झालात मणिपूरमध्ये? असा सवाल राऊत यांनी केला.
फडणवीस कोणत्या दुनियेत?
कितीही प्राणी एकत्र आले तरी वाघाची कोणी शिकार करू शकत नाही. मोदी हे वाघ आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावरून त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदींची शिकार झालीय. मोदींना घेरण्यात आलंय. मोदी पळत आहेत इकडे तिकडे. मणिपूरला जाऊन दाखवा. काश्मीरला जाऊन दाखवा. कोणत्या दुनियेत आहेत फडणवीस? संपूर्ण मणिपूर जळत आहे. काय केलं तुम्ही? मणिपूरच्या लोकांनी शिकार केलीय तुमची, असा हल्ला त्यांनी चढवला.
त्यांचं रामायण नकली
आदीपुरुष सिनेमात राम, रावण आणि हनुमानाच्या तोंडी टपोरी संवाद दाखवले आहेत. तसेच या सिनेमातून इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यावरूनही त्यांनी भाजपला घेरलं. एका अभिनेत्रीने भगवी बिकनी घातली होती, तेव्हा भाजपने हंगामा केला होता. हिंदुत्वाच्या नावावर आज एका सिनेमातून नौटंकी आणि तमाशा सुरू आहे. त्यावर भाजप काही बोलत नाही. हे ढोंग नाही का? आता हिंदुत्व धोक्यात नाही? आता कारवाई करायला कायदा नाही का? हे रामाच्या नावाने ढोंग करत आहेत. त्यांचं रामायण नकली आहे, असं ते म्हणाले.