पंतप्रधान मोदी आपल्यासोबत इतका खोटारडा माणूस कसा ठेवतात?, संजय राऊत यांचा सवाल; निशाणा कुणावर?
जर 32 वर्षाचा एक तरुण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जनमाणस कुणाच्या बाजूने आहे हे पाहण्यासाठी राजीनामा देण्याचं आव्हान देत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारलं पाहिजे.
मुंबई: ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री इतकं खोटं कसं बोलू शकतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा खोटारड्या माणसाला सोबत कसं ठेवतात? त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार आहोत. असं संजय राऊत यांनी सांगितलं.
चिंचवडच्या जागेबाबत शिवसेना आग्रही असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. चिंचवडसाठी आम्ही आग्रही आहोत. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. नागपूरला आमचा उमेदवार दिला होता. पण आघाडी म्हणून जिंकायचं हे ठरल्यावर शिवसेनेने त्यागाची भूमिका ठेवली. आपल्यामुळे आघाडीचं नुकसान नको ही भूमिका घेतली. आमचा राजकीय शत्रू एकच. त्याचा पराभव व्हावा. ते विधान परिषदेत आम्ही करून दाखवलं, असं संजय राऊत म्हणाले.
मतभेद आणि रस्सीखेच नाही
अमरावती आणि नागपूर या महत्त्वाच्या जागा आम्ही जिंकल्या. त्या केवळ एकीमुळे. कसबा आणि चिंचवड महाविकास आघाडी एकत्रित लढेल. चिंचवडच्या जागेसाठी आमचा आग्रह आहे. पण महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ. जिंकण्याची संधी कुणाला त्यावरून कोणती जागा कुणी लढवावी हे ठरवलं जाईल.
आमच्यात कोणतेही मतभेद आणि रस्सीखेच नाही. अंधेरीची निवडणूक जिंकलो तेव्हा आम्हाला सर्वांनी पाठिंबा दिला. कसबा आणि चिंचवडमध्येही आम्ही त्याच स्पिरिटने लढू, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्याने देवी पावते काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा शक्ती प्रदर्शनानं, पैशाची ताकद दाखवून देवी काय पावते का? ती कोकणातील भराडी देवी आहे. या देवीने कायम शिवसेनेला आशीर्वाद दिलाय.
पाठिंबा असता तर कालच्या निवडणुकीत दिसला असता. ती कोकणच्या भूमीवरील देवी आहे. देवीचं महत्त्व आणि मांगल्य काय हे आम्हाला माहीत आहे. पैशाचं खेळ करून देवस्थानं आणि श्रद्धास्थानं ताब्यात घेता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
विश्वासघात हा विश्वासू माणसांकडूनच होतो
शिवसेनेतील बंडाबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार यांचं म्हणणं त्यांनी आमच्याकडे व्यक्त केलं होतं. गाफील राहिलो म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी जास्त विश्वास ठेवला. आपल्या विश्वासू लोकांवर जास्त विश्वास ठेवला आणि विश्वासघात हा विश्वासू माणसांकडूनच होत असतो. हे अजित पवारांना माहीत आहे. ते त्यांना सांगायला नको, असं ते म्हणाले.
सुगावा सर्वांनाच लागला होता
आम्ही उद्धव ठाकरे यांना या हालचाली सांगत होतो. असं काही नाही की फक्त अजितदादाच सांगत होते. या हालचालींचा सुगावा सर्वांना लागला होता. तरीही उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की, हे आपले लोकं आहेत. निष्ठावंत लोकं होतं. त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
आव्हान स्वीकारा
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 32 वर्षाच्या एका तरुणाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय ते त्यांनी स्वीकारावं. मुख्यमंत्री स्वत:ला क्रांतीकारक म्हणतात. आम्ही क्रांती केली म्हणतात. क्रांतीकारकाने कुणाला घाबरायचं नसतं. त्यांनी बेडरपणे समोर जायचं असतं, असा टोला त्यांनी लगावला.
राजीनामा द्या
जर 32 वर्षाचा एक तरुण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जनमाणस कुणाच्या बाजूने आहे हे पाहण्यासाठी राजीनामा देण्याचं आव्हान देत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारलं पाहिजे. कारण मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे सत्तेवर बसले. त्याचा राजीनामा देऊन त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.