मोदी राजीनामा देणार आहात काय? भाजपकडून अपघाताचाही इव्हेंट; संजय राऊत यांचा हल्लाबोल
काही म्हणतात हा घातपात आहे. मग तुमचं सरकार का करतंय? गृहविभाग काय करतो? रेल्वेचं टेक्निकल विभाग काय करतोय? कोण घेणार प्रायश्चित? जबाबदारी कोणावर टाकणार? ही सरकारची जबाबदारी नाही का?
मुंबई : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण अपघातात 200 हून अधिक प्रवासी ठार झाले. 900 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. एकीकडे बुलेट ट्रेन आणण्याची कवायद सुरू असतानाच दुसरीकडे ट्रेनच्या या भीषण अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षा आणि सुविधेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही याच मुद्द्यावर बोट ठेवलं आहे. साधी ट्रेन चालवता येत नाही. रेल्वेत सुविधा दिल्या जात नाहीत अन् बुलेट ट्रेन आणल्या जात आहेत, असा चिमटा काढतानाच सीबीआय चौकशी हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार आहेत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
देशातील इतिहासातील सर्वात भयंकर अपघात होता. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातस्थळी गेले. तिथे मोदी मोदींच्या घोषणा झाल्या. हे सरकार अपघाताचंही इव्हेंट करत आहे. या देशात असं कधी झालं नाही. जिथे सीबीआय चौकशी करायची तिथं करत नाही. आम्ही भाजपला पुरावे दिले. पण चौकशी नाही. मुळात सीबीआय चौकशी हा वेळकाढूपणा आहे. पंतप्रधान राजीनामा देणार आहात? जबाबदारी कोण घेणार?अपघाताचं इव्हेंट करणारं हे सरकार आहे. स्मशानातही तुम्ही इव्हेंट करत आहात?, असा सवाल संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
जबाबदारी कोण घेणार?
रेल्वेतील सुरक्षा कवचाच्या वल्गना केल्या. पण सुरक्ष कवच नव्हते. मोठमोठ्या बाता करतात. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. सिग्नल, ट्रॅफिक सिग्नलिंग यावर काम करा. वंदे भारत वगैरे या केवळ घोषणा आहेत. हा त्यांचा प्रचार आहे. वास्तवात काही नाही. कालची घटना भयंकर होती. काही रुग्णालयात कफनही नव्हतं. आता रडून काही चालणार नाही.
आता सीबीआयची चौकशी करणार आहेत. काही म्हणतात हा घातपात आहे. मग तुमचं सरकार का करतंय? गृहविभाग काय करतो? रेल्वेचं टेक्निकल विभाग काय करतोय? कोण घेणार प्रायश्चित? जबाबदारी कोणावर टाकणार? ही सरकारची जबाबदारी नाही का? रेल्वे मंत्र्यांची जबाबदारी नाही का? असा सवालही त्यांनी केला.
सीबीआय काय करणार?
या ट्रेन नीट चालवत नाहीत. अन् कर्ज काढून बुलेट ट्रेन आणत आहेत. या सरकारकडे नैतिकता आहे का? हिरवे झेंडे दाखवून फक्त इव्हेंट केला जातोय. ज्या सुविधा हव्यात त्या दिल्या जात नाहीत. सीबीआय यात काय करणार ते सांगा. तुमचा तांत्रिक विभाग काय करतो? रेल्वेचा तांत्रिक विभाग काय करतो? अशा शब्दात राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला.