नेहरू, मोरारजी देसाई यांनीही माफी मागितली, आता भाजपचे टगे महाराष्ट्राला शहाणपण शिकवताहेत; संजय राऊत संतापले
जे राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने हा विषयही बाजूला करू, असं त्यांना वाटत असेल. महाराष्ट्रावर कर्नाटकाकडून अन्याय होतोय, त्यात हे सर्व बाजूला सारलं जाईल असं त्यांना वाटतंय.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या अवमानकारक उद्गाराचे अजूनही पडसाद उमटत आहेत. या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. पंडित नेहरू आणि मोरारजी देसाई यांच्याकडून शिवाजी महाराजांचा अपमान झाला. चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली. पण भाजपचे टगे राज्यपालांची बाजून घेऊन आम्हालाच शहाणपण शिकवत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला.
पंडित नेहरूंकडून शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता. तेव्हा त्यांनी माफी मागितली होती. इतके ते मोठे होते. त्यांना कळलं आपल्याकडून चूक झाली. पंतप्रधान असतानाही त्यांनी माफी मागितली. मोरारजी देसाई यांनीही शिवाजी महाराजांविषयी चुकीचं विधान केलं होतं, त्यांनीही माफी मागितली. पण भाजपचे जे टगे आहेत ते टगे महाराजांचा अपमान करून परत महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहेत, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.
भाजपचे टगे महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहे. राज्यपालांची बाजू घेत आहे. हे महाराष्ट्र बघत आहे. महाराष्ट्र संतापलेला आहे. महाराष्ट्र आतून खवळलेला आहे. याचा आतून उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. वेट अँड वॉच, असा इशाराच राऊत यांनी दिला.
पंडित नेहरूंवर चिखलफेक थांबवा हे आम्हीच सर्वात आधी म्हणालो होतो. पंडित नेहरू होते म्हणून हा देश पुढे गेला. या देशातील कोणत्याही महान नेत्याचा अपमान होऊ नये. नेहरू, आंबेडकर, पटेल आणि सावरकर यांचा अपमान होऊ नये. जे नेते जिवंत नाही, त्यांच्यावर चिखलफेक करून राजकारण कसलं करताय? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
वीर सावरकरांविषयी एवढं प्रेम उफाळून आलं असेल तर द्या ना भारत रत्न. इंडिया गेटवर सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारला. तिथे सावरकरांचा पुतळा का उभारला नाही? लावा ना सावरकरांचा पुतळा. आम्ही येतो स्वागत करायला. पण नाही. यांना फक्त सावरकरांच्या नावाने राजकारण करायचं आहे. आमचं तसं नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जातोय. आमच्या आराध्य दैवतांचा अपमान भाजपच्या आराध्य दैवतांकडून होतोय, म्हणजे राज्यपाल कोश्यारींकडून होतोय. त्यांचे राष्ट्रीय प्रवक्तेही अपमान करत आहेत.
जे राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने हा विषयही बाजूला करू, असं त्यांना वाटत असेल. महाराष्ट्रावर कर्नाटकाकडून अन्याय होतोय, त्यात हे सर्व बाजूला सारलं जाईल असं त्यांना वाटतंय. पण तसं होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जी पावलं उचलायची आहे. ती आम्ही उचलत आहोत. काल छत्रपती संभाजी राजे, छत्रपती उदयनराजे यांनी जी भूमिका घेतलीती लोकभावना आहे. राज्यपालांचे कार्यक्रम जिथे होतील ते कार्यक्रम उधळून लावू ही लोक भावना आहे.
अजून संयम राखलाय महाराष्ट्राने. अन् तरीही राज्यपालांचा बचाव केला जात आहे. त्या सुधांशु त्रिवेदीचा बचाव केला जातोय. या महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.