Sanjay Raut: काश्मीर हिंदुंच्या रक्ताने रोज भिजून चाललाय, आठ वर्ष कसले साजरे करताय?; राऊतांनी भाजपला फटकारले
Sanjay Raut: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांच्या पलायनवर निवेदन दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची सरकार आणि शिवसेना काश्मीर पंडितांच्या बाजूने राहिल. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना काही मदत असल्यास आम्ही देऊ.
मुंबई: तिकडे काश्मीर हिंदुंच्या (hindu) रक्ताने रोज भिजून चालला आहे. रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हिंदू समाजातील इतर लोकांच्या हत्या सुरू आहेत. आठ वर्ष कसले साजरी करताय? असा संतप्त सवार करतानाच भाजपला (bjp) टीका करायला काय झालं? काश्मीर पंडित मरत आहेत. त्यावर बोला. टीका कसली करताय? 1990मध्ये काश्मीर पंडितांची हत्या व पलायन झालं. तेव्हा भाजपच सत्तेवर होतं. आताही सत्तेवर आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. भाजपच्या रिपोर्ट कार्डमध्ये काश्मीर पंडितांच्या घरवापसीचा मुद्दा आहेत का? सर्जिकल स्ट्राईकनंतरही हत्या थांबल्या नाहीत, असं सांगतांनाच काश्मीर पुन्हा जळत आहे. काश्मीरमध्ये रक्तपात होत आहे. काश्मीरची परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. आमचे दिल्लीचे प्रमुख लोक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. कधी काश्मीर फाईल्सचं प्रमोशन होतंय, तर कधी पृथ्वीराजचं प्रमोशन होतंय. पण काश्मिरी पंडितांचा आक्रोश कोणी ऐकायला तयार नाही, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदुंच्या हत्येवरून भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. काश्मीरमधून काश्मिरी पंडित पलायन करत आहेत. सरकार भाजपचं आहे. त्यावर भाजपचे नेते बोलायला तयार नाहीत. तुम्ही ताजमहल खालचं शिवलिंग शोधत आहात. तुम्ही ज्ञानवापी खाली शिवलिंग शोधून वाद निर्माण करत आहात. पण काश्मिरी पंडितांकडे दुर्लक्ष करत आहात, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
काश्मिरात 20 मुस्लिम जवान मारले गेले
काश्मीरमध्ये मुस्लिमही सेक्युरिटी फोर्समध्ये काम करत आहेत. त्यांचीही हत्या होत आहे. श्रीनगरपासून पुलवामापर्यंत आतापर्यंत 20 मुस्लिम जवानांची हत्या झाली आहे. हवालदार, डीवायसएसपी रँकच्या लोकांना मारलं आहे. कारण ते देशाचं संरक्षण करत आहेत. काश्मीर पंडितांना हाकलून लावलं जात आहे. मारलं जात आहे. त्यांना काश्मीर खोरं सोडून आपल्याच देशात परागंदा व्हावं लागलं आहे. पण सरकार काय करत आहे?, असा सवालही त्यांनी केला.
काश्मीर पंडितांसाठी योजना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांच्या पलायनवर निवेदन दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची सरकार आणि शिवसेना काश्मीर पंडितांच्या बाजूने राहिल. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना काही मदत असल्यास आम्ही देऊ. त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार एक योजना तयार करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून काश्मीर पंडितांचं आणि शिवसेनेचं एक नातं राहिलं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
शक्तीप्रदर्शन करणार नाही
यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं. येत्या 15 जून रोजी आम्ही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात अयोध्येला जाणार आहोत. महाराष्ट्रातून काही नेते जातील. मोठं वातावरण करायचं नाही. अयोध्या दौरा हा धार्मिक आहे. शक्तीप्रदर्शन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.