भाजपलाच पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचं काहीच वाटत नसेल तर… संजय राऊत असं का म्हणाले?
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची ईडी मार्फत चौकशी होणार आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुमच्या हातात सत्ता आहे.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवार 19 जानेवारी रोजी बीकेसी मैदानावर प्रचंड मोठी सभा होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार असून या सभेत विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र, या लोकार्पणापूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. हे प्रकल्प आमच्याच काळातील आहेत. त्यातील काही प्रकल्पांचे उद्घाटनही झाले आहे. परत या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन का होत आहे? भाजपला पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेचं काहीच पडलं नाहीये का? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.
मुंबईतील बहुतेक सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडीच्या काळातील आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना त्याची प्रक्रिया पूर्ण झाली. ती कार्यान्वित झाली. उद्घाटनेही झाली. त्याच प्रकल्पासाठी सरकार पुन्हा पुन्हा उद्घाटन करत आहे. पंतप्रधानांना बोलावून उद्घाटन करून श्रेय घेण्याचं काम करत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचा हा प्रकार आहे. पंतप्रधानांची एक प्रतिष्ठा असते. आधीच झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. ज्या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे, त्याच्या योजना आम्ही केल्या. पण भाजपची ती भूमिकाच असेल… अन् पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचं त्यांना काही वाटत नसेल तर त्याला काय करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, नाशिक आणि नागपूरच्या जागेबाबत राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि इतरांबाबत दुपारी निर्णय घेऊ. या प्रश्नावर मातोश्री येथे बैठक होत आहे. या संदर्भात माझी सकाळी शरद पवारांशी चर्चा झाली. आघाडीतील नेत्यांशी समन्वय सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची ईडी मार्फत चौकशी होणार आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुमच्या हातात सत्ता आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आहेत. त्यामुळे बदनामीच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. ज्या प्रकारचा कलकलाट सुरू आहे त्यावरून हे स्पष्ट दिसतंय, असं ते म्हणाले.
मुंबईत उत्तर प्रदेशप्रमाणे गंगेत प्रेते तरंगले नाहीत, हे उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं यश आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले. नाही तर मीठी नदीत प्रेते दिसली असती.
त्यावेळी पारदर्शक व्यवहार झाले होते. ज्या कायद्यानुसार निर्णय घ्यायच्या त्यानुसार निर्णय घेतले. गुजरातमध्ये मृतदेहांना स्मशानात जागा मिळत नव्हत्या. महाराष्ट्रात असं घडलं नाही. सरकारने आभार मानले पाहिजे. भाजपने आभार मानले पाहिजे, असं ते म्हणाले.