संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला; म्हणाले, शिवसेना काय एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी…
शिवसेना एकच आहे. ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आहे. बाकी सर्व चोर, लफंगे आहेत. उद्या काही लोक म्हणतील आम्हीच असली शिवसेना, आम्हीच असली राष्ट्रवादी आम्हीच असली काँग्रेस असं कसं चालेल? असं होत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
अविनाश माने, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याच्या रॅलीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही गटाने मैदान मिळवण्यासाठी एक महिना आधीच पालिकेकडे अर्ज केला आहे. दोघांनीही आमचीच शिवसेना खरी असून आम्हालाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरून दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बापच काढला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाप काढला आहे. आम्ही खरी शिवसेना आहोत. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची आम्हालाच परवानगी द्यावी, अशी मागणी शिंदे गटाने महापालिकेकडे केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांचा तोल ढासळला. का
शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली होती का? प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानानंतर कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख निवड केली. ही खरी शिवसेना आहे. हा फुटलेला गट नाही. तो फुटलेला गट आहे. राज्यात तुमच्या हाती सत्ता आणि देशातही सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही काही कराल असं चालणार नाही. गेल्यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. यावेळीही दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
ते मोदींनी म्हणायला हवं होतं
मते द्यायची असेल तर द्या, नाही तर नका देऊ. पण निवडणुकीत मालपाणी मिळणार नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपला चिमटे काढले आहे. हा आत्मविश्वास आहे. तो सर्वांना असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्ष खुर्ची सांभाळली आहे.
खरं तर गडकरी जे म्हणाले ते मोदींनी सांगितलं पाहिजे होतं. दहा वर्ष मी एवढं काम केलं आहे. देशाला पुढे नेलं. बेरोजगारी हटवली. महागाई दूर केली. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल केलं आहे. आबाद ही आबाद है, आता मी पोस्टर लावणार नाही, सभा घेणार नाही. असं मोदींनी म्हणायला हवं होतं. पण ते म्हणत नाहीत. हा भाजपचा नारा असायला हवा होता, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
लोकशाही वाऱ्यावर सोडून
यावेळी त्यांनी घाना दौऱ्यावरून विधानसभा अद्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली. अध्यक्ष वेळकाढूपणा करतात यात नवीन काय. ते एक वर्षापासून वेळकाढूपणा करत आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून दिली आहे. पण आमचे स्पीकर साहेब लोकशाही वाऱ्यावर सोडून घानाला चालले होते. आम्ही विरोध केला. मला असं कळलंय त्याांचा दौरा रद्द झाला, असं राऊत म्हणाले.
ठाण्याला जा
आम्ही नार्वेकर यांच्या घाना दौऱ्याला विरोध केला. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत होतो. कशा प्रकारे विधानसभेचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयही मानायला तयार नाहीत. राज्यात घटनाबाह्य सरकार अध्यक्षाच्या मदतीने चालवले जात आहे, हे कोर्टाला सांगणार होतो.
शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरत आहेत, असे कोर्टाचे निर्देश असतानाही अध्यक्ष त्यावर सुनावणी घेत नाहीत. त्यांना सुनावणी करण्यास वेळ नाही आणि ते घानाला लोकशाहीवर प्रवचन द्यायला चालले होते. आता घाना नव्हे ठाण्याला जाऊन लोकशाहीवर प्रवचनं द्या. तिथे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, असा चिमटा त्यांनी काढला.