तुमच्या घरातील प्रकरण स्टंट नाही का?; संजय राऊत यांचा थेट फडणवीस यांना सवाल
हे सरकार आल्यापासून राज्यात जाणीवपूर्वक दंगली घडवल्या जात आहेत. कारण जनतेचा पाठिंबा मिळत नाही. जनभावना त्यांच्याविरोधात आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम करून काही हातपाय मारता येतात का ते पाहत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : आम्हाला धमक्या येतात तेव्हा हा स्टंट असल्याचं गृहमंत्री म्हणतात. गृहमंत्री आमची चेष्टा करतात. तुमच्या घरात जे होतं ते स्टंट नाही का? तुमच्या घरातील प्रकरणावर तुम्ही एसआयटी स्थापन करता. लोकांना अटक करता. पण सत्य काय हे मला माहीत आहे. पण आम्हाला मर्यादा ठेवायची आहे. मी खरं बोललो तर भूकंप होईल, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. काल मला धमकी आली. त्यामुळे मी तात्काळ पोलिसांना कळवलं. लोकप्रतिनिधी म्हणून पोलिसांना कळवणं माझं कर्तव्य होतं. उद्या मी सांगितलंच नव्हतं असं म्हणायला नको, म्हणून पोलिसांना कळवलं, असं संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. मी गांभीर्याने आणि काळजीपूर्वक विधान केलं आहे. राज्यात गव्हर्नमेंट स्पॉन्सर गुंडगिरी, दहशतवाद आणि दंगली सुरू आहेत, हे मी स्पष्ट सांगतो. मी घाबरणारा नाही. मी ठाण्याच्या प्रकाराबाबत गृहमंत्र्यांना सांगितलं. मर्डर केसमधून आलेल्या गुंडाकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी काय केलं? गृहमंत्र्यांनी काय केलं? तुम्ही राज्याचं गृहमंत्री आहात ना? तुम्ही काय केलं ते सांगा. मला सांगा. जनतेला सांगा, असं संजय राऊत म्हणाले.
कधीही पारडं बदलू शकतं
आम्ही मर्यादा पाळल्या. तुम्हाला आमच्या आणि आमच्या कुटुंबियांची काळजी नाही. विरोधकही माणसंच आहेत. त्यांनाही कुटुंब आहे. ते सुद्धा सामाजिक जीवनात वावरत असतात. पण लक्षात घ्या सत्ता आज आहे उद्या नाही. कधीही बदलू शकतं पारडं, असा इशारा राऊत यांनी दिला.
उद्याची सभा मोठी होणार
उद्या संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. उद्या सभा होणार आहे. उद्धव ठाकरे उद्याच्या सभेला संभाजीनगरला जातील. सभेची जय्यत तयारी झाली आहे. या सभेसाठी मराठवाड्यातून जनता येईल. मराठवाड्यातील प्रचंड मोठी सभा उद्या होणार आहे, असा दावा त्यांनी केला.
राजकारण चाटूगिरीवरच
संभाजीनगरातील शिंदे समर्थक कार्यकर्ता संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी खोटं काय बोललो? चाटूगिरी ही राजकारणातील एक संज्ञा आहे. एक वाकप्रचार आहे. चाटूगिरी कोण करत नाही? सध्याचं राजकारण चाटूगिरीवरच आहे ना. चाटुगिरी केली नसती तर सरकार पडलंच नसतं. सध्याचं राजकारण बदललंच नसतं. चाटूगिरीमुळे मानहानी झाली नसेल तर तुम्ही चाटूगिरी केली नाही हे सिद्ध करा, असंही त्यांनी सांगितलं.