सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे, संजय राऊत म्हणाले, सत्यमेव जयते यालाच म्हणतात
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. हे सरकार नपुंसक आहे, असं सर्वोच्च न्यायालय म्हणालं. आम्ही नाही. या मागे आम्ही नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, अशा शब्दात राज्य सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत. कोर्टाच्या या ताशेऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यातील सरकार नपुंसक आहे. हे आम्ही म्हणत नाही. यामागे आम्ही नाही. कोर्ट म्हणत आहे. यापूर्वी जनता म्हणत होती. त्यामुळे आता तरी या सरकारचं डोकं ठिकाणावर येईल अशी आशा आहे, असं सांगतानाच सत्यमेव जयते यालाच म्हणतात, असं संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटलं. गेल्या पाच-सहा महिन्यापासून जनता तेच म्हणत आहे. नपुंसक, बिनकामाचे अशा अनेक उपाध्या कोर्टाने लावल्या आहेत. यामागे आम्ही नाहीत. जर या देशातील कोर्टाचं हे निरीक्षण सरकारविषयी असेल तर यावरून सरकारची पत काय? प्रतिष्ठा काय? हे दिसून येतं. हे सरकार कशा पद्धतीने सत्तेवर आलं आणि काम करतं हे कोर्टाच्या वाक्यातून स्पष्ट झालं आहे. कोर्टाने कधीच कोणत्याही राज्याविषयी नपुंसक हा शब्द वापरला नाही, असं संजय राऊत म्हणाले.
गुलाम असल्याची जाणीव
राज्यात सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री स्वत:ला गुलाम असल्याची जाणीव करून देत असतात. खाऊ का? बसू का? उठू का? लिहू का? असं वारंवार दाखवून देत असतात. यावरच कोर्टाने हल्ला केला आहे. राज्यात विविध मार्गाने जातीय आणि धार्मिक तणाव वाढावा, दंगली व्हाव्यात, अस्थिरता राहावी असं काम हे सरकार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. कोर्टाने एकच हातोडा मारला. आता तरी सरकारचं डोकं ठिकामावर यावं. जनतेचं डोकं ठिकाणावर आहेच. आता सरकारचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे, असं ते म्हणाले.
सरकारचा जीव खोक्यात
ज्या सरकारचा जीव खोक्यात आणि पेट्यात असतो त्याला नपुसंक म्हणतात. कोर्टाने बरोबर तोच मुद्दा उचलला. सत्यमेव जयते यालाच म्हणतात. राज्याची स्थिती गंभीर आहे. सरकारचे लोक केवळ राज्यात अस्थिरता आणि अशांतता निर्माण करण्याचं काम आहेत. हे सरकार झोपलेलं आहे. हे सरकार नामर्द आहे. हे कोर्टाचं निरीक्षण आहे, असंही ते म्हणाले.