Sanjay Raut on PM Modi: बैठक कोरोनाची पण पंतप्रधानांनी इतर विषयावरच तारा छेडल्या; राऊतांची खोचक टीका
Sanjay Raut on PM Modi: बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांनी त्यांची वेदना व्यक्त केली आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी काल बोलावलेल्या बैठकीवर मी बोलणार नाही. ते योग्यही नाही. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ती बैठक होती. पंतप्रधान कोरोना स्थितीवर मार्गदर्शन करणार होते. पण त्यांनी इतर विषयांवरच तारा छेडल्या, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केली. ममता बॅनर्जी असतील, उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) असतील, चंद्रशेखर राव असतील. त्यांची विधाने पाहिल्यावर कळेल पंतप्रधानांचा कालचा संवाद एकतर्फी होता. बिगर भाजप शासित राज्यातील मुख्यंत्र्यांना टोमणे मारण्याचं काम जास्त झालं. पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नाही. काल जो विषय निघाला तो अनावश्यक होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठी बाण्याला जागून जे काही सांगायचं ते सांगितलं. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांनी त्यांची वेदना व्यक्त केली आहे. कोरोनाची जी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर पंतप्रधानांनी बोलायला हवं होतं. इतरांचं म्हणणं जाऊन घ्यायला हवं होतं. पण त्यांनी एकतर्फी डायलॉग केला. जिथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तिथे पंतप्रधानांची भूमिका वेगळी आणि ज्या राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत, तिथे भूमिका वेगळी हे योग्य नाही. राष्ट्रासाठी एक भूमिका असावी ती दिसली नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
आर्थिक व्यवहारावर बोला
काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतचे लकडावालाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मला कोणी आरोप केला माहीत नाही. संबंधित व्यक्तीचे कुणाशी व्यवहार झाले. ज्याच्याशी आर्थिक व्यवहार झाले. त्याला ईडीने चौकशीसाठी का बोलावले नाही? हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर द्यावं. सत्य बोललं की त्यापासून पळ काढायाचा, भूमिगत व्हायचं आणि संभ्रम निर्माण करायचा हे त्यांचं धोरण आहे, अशी टीकाही त्यांनी केली. लकडावालासोबत कुणाचा फोटो आहे हा सवाल नाही. त्यांच्या सोबत कुणी आर्थिक व्यवहार आणि गैरव्यवहार केला त्यावर बोला. कुणी कुणासोबत फोटो काढला त्याने काय होणार? तुमच्याकडे उत्तर नसेल तर तुम्ही फोटो बाहेर काढून दिशाभूल करता. आज मोबाईल कॅमेऱ्याच्या जमाना आहे. यावेळी कुणीही कुणाबरोबर फोटो काढतो. त्यांना रोखणं हे आपल्या हातात नसतं, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबईत सभा होणार
यावेळी त्यांनी मुंबईत शिवसेनेची सभा होणार असल्याचं जाहीर केलं. पुण्याची सभा आहे. पुण्यात जाऊन बोलू. मुंबईत लवकरच सभा होणार आहे हे मात्र नक्की, असंही ते म्हणाले.