शरद पवार गटात जोरदार हालचाली, वरिष्ठ पातळीवर मोठं काहीतरी घडतंय
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर मोठा निकाल जाहीर केला आहे. या निकालात अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर शरद पवार गटाला मोठा झटका मिळाला आहे. या निकालानंतर शरद पवार गटात तातडीने हालचालींना वेग आला आहे.
संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 6 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज अखेर निकाल जाहीर केला आहे. या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे. अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. तर शरद पवार यांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आता शरद पवार यांच्या गटाला उद्या दुपारी चार वाजेपर्यंत पक्षाचे तीन नावं आणि चिन्हं सादर करावी लागणार आहे. त्यापैकी एका नावाची आणि चिन्हाची निवड निवडणूक आयोग करणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालामुळे शरद पवार गटात एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर निकाल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. या निकालानंतर आता शरद पवार गटात तातडीने हालचाली वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार गटात नेमक्या हालचाली काय?
निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर शरद पवार गटात तातडीने हालचाली वाढल्या आहेत. शरद पवार गटाच्या वकिलांची तातडीने दिल्लीत ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे या बैठकीला उपस्थित आहे. या दोन्ही ज्येष्ठ वकिलांची इतर वकिलांसोबत चर्चा सुरु आहे. या बैठकीत सल्ला मसलत घेतली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात उद्या सकाळपर्यंत सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना या निकालावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलं आहे. तसेच आपला पक्ष या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा निकाल अपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.