मोठी बातमी ! शाळेतील ‘प्रभू श्री राम’ या विषयांवरील स्पर्धांना शरद पवार यांचा विरोध; म्हणाले, सेक्युलर राज्यात…
भाजपने फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्यासाठी काय केलं? ज्यांची सत्ता आहे त्यांची विचारधारा काय आहे? त्यांना फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेत जराही इंटरेस्ट नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी शरद पवार यांनी शाळांमध्ये प्रभू श्री राम या विषयावर विविध स्पर्धा घेण्यास विरोध केला आहे.
पुणे | 9 जानेवारी 2024 : मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये प्रभू श्री राम या विषयांवर विविध स्पर्धांचं आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईच्या पालकमंत्र्यांनी महापालिका शाळांना हे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकाही कामाला लागली आहे. मात्र, शाळांमध्ये प्रभू श्री राम या विषयावर स्पर्धा घेण्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्र हे राज्य सेक्युलर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अशा गोष्टी व्हायला नकोत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिका काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं. शाळांमध्ये प्रभू श्री राम या विषयावर वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा होणार आहेत. त्याबाबत तुमचं मत काय आहे? असा सवाल पवार यांना करण्यात आला होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोध केला आहे. माझ्याकडे याबाबत काही शिक्षकांची तक्रार आली आहे. पालकमंत्री या प्रकारात लक्ष घालत असल्याचं त्यांनी सांगितलं. पालकमंत्री या स्पर्धा राबवण्यासाठी पूर्ण शक्ती लावत आहेत. हे योग्य नाही. हा देश सेक्युलर आहे. सर्व धर्माची आस्था आहे. हिंदू किंवा राम यांच्याबद्दल जेवढी आस्था आहे, तेवढीच इस्लाम , येशूबद्दलही आहे. त्यामुळे या प्रकारच्या भूमिका नव्या पिढीच्या मनावर कोरणं सेक्युलर राज्यात योग्य नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
निमंत्रण नाही, पण निवांत जाईल
तुम्ही अयोध्येला जाणार का? असा सवालही त्यांना करण्यात आला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला अद्याप निमंत्रण आलं नाही. मला निमंत्रण येणार आहे हे मी माध्यमातून वाचत आहे. निमंत्रण आलं नाही तरी राम हा श्रद्धेचा विषय आहे. रामाबद्दल लोकांच्या मनात आदराचं स्थान आहे. आमच्या मनातही श्रद्धा आहे. ही श्रद्धा कायमच राहील. मला अयोध्येला जायचं तेव्हा जाईल. मला निमंत्रणाची गरज नाही. गर्दीच्या मेळ्यात जाणार नाही. तिथे गर्दी खूप आहे. दोन वर्षाने, तीन वर्षाने, कधी तरी जाईल. निवडणुकीनंतर शांतपणे मी तिथे जाईल, असं पवार म्हणाले.
रामाची अप्रतिष्ठा केली नाही
यावेळी शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. जितेंद्र आव्हाड काही वेगळं बोलले नाही. वाल्मिकी रामायणात जे म्हटलं तेच त्यांनी सांगितलं. त्यांनी आहे तेच सांगितलं. पण त्यांनी बोलण्याची गरज नव्हती. बोलले नसते तर चांगलं झालं असतं. पण त्यांनी रामाची अप्रतिष्ठा केली असं म्हणणं योग्य नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय.