मोठी बातमी ! अदानी ‘मातोश्री’वर कशाला गेले होते?; शर्मिला ठाकरे यांच्या सूचक विधानाने खळबळ
आदित्य ठाकरे यांच्या चौकशीच्या मुद्दयावर आम्ही आता काहीच बोलणार नाही. हा कायद्याचा भाग आहे. सूडभावना ही गोष्ट वेगळी आहे. शर्मिला वहिनी सांगतात त्याप्रमाणे ठाकरे कुटुंब असे काही करणार नाही, त्यावर आमचा विश्वास आहे, असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 18 डिसेंबर 2023 : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियनप्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून आरोप करण्यात आले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. अशावेळी आदित्य ठाकरे यांच्या काकू म्हणजे शर्मिला ठाकरे त्यांच्या मदतीला धावून गेल्या. आदित्य असं काही करेल असं वाटत नाही, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले. तर, उद्धव ठाकरे यांनी आभार मानल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोले लागावले.
शर्मिला ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तुमचे आभार मानलेत असं विचारण्यात आलं. त्यावर शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी आभार मानायची संधी आम्हाला केव्हाच दिली नाही. किणी प्रकरणावरून त्यांनी आम्हाला चिमटे काढले. त्या प्रकरणावरूनही बोलायची संधी सोडली नाही. पण मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला. आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही. ते लहान भावाला कायम बोलतात. टोमणे मारायची संधी सोडत नाहीत, असे टोले शर्मिला ठाकरे यांनी लगावले.
तुमचे हात कुणी धरले होते?
धारावी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांचे हात धरले होते का? चांगले निर्णय घ्यायला त्यांना कोणी थांबवलं होतं का?, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी केला. सर्व विरोधी पक्ष नेते म्हणतायत की आरक्षण द्या. मग त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? तुम्हाला कोणी थांबवलं होत? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसला होतात. धारावीचा पुनर्वीकास करायचा होता. मग तुम्ही का केला नाही? असा सवाल करतानाच साहेबांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे, असं त्या म्हणाल्या.
अदानी मातोश्रीवर कशाला गेले होते?
यावेळी त्यांनी अदानींच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांना घेरले. दीड वर्षांपूर्वी अदानी मातोश्रीवर भेटायला कशाला गेले होते हे तुम्ही शोधा, असं सूचक विधान करून शर्मिला ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
शेवटी ते ठाकरे कुटुंब आहे
दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही शर्मिला ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे यांची जी भूमिका आहे, तीच भूमिका आमची आहे आणि तीच भूमिका पक्षाची सुद्धा आहे. ठाकरे परिवारातील कोणताही व्यक्ती असं कृत्य करणार नाही असाच आमचा विश्वास आहे. सूडभावना आहे की नाही यावर मी बोलणार नाही. पण ठाकरे कुटुंबातील कोणीही असं कृत्य करणार नाही. शेवटी ते ठाकरे कुटुंब आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
त्यांनी कधीच सन्मान ठेवला नाही
उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले. त्यावरही नांदगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. वहिनींपेक्षा आमच्या भावना वेगळ्या नाहीत. त्यांचा त्यांनी विचार करावा, असं सांगतानाच प्रत्येक वेळी राज ठाकरे यांनी मदतीची भावना ठेवली आहे. पण त्यांनी कधी त्यांचा सन्मान ठेवला नाही. आम्ही आमची लढाई लढत आहोत, असंही ते म्हणाले.