उद्धव ठाकरे यांचा ‘तो’ फोटो शीतल म्हात्रे यांच्याकडून ट्विट; म्हणाल्या, कुणी कुणाला केला मुजरा?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून जोरदार जुंपली आहे. राऊत यांनी केलेल्या टीकेचा म्हात्रे यांनी ट्विटरवरून समाचार घेतला आहे.
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि इतरांचे हायकमांड दिल्लीत आहेत. त्यामुळे ते दिल्लीत जातात. दिल्लीत त्यांची मक्का मदिना आहे. पण तुम्ही का दिल्लीत जाता? तुम्ही का दिल्लीत मुजरा करायला का जाता? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. तुम्ही स्वत:ला असली शिवसेना समजता तर दिल्लीत जाताच कसे? बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कधी दिल्लीत मुजरा करायला गेले होते का? असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला होता. संजय राऊत यांच्या या विधानाचा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला आहे. निव्वळ समाचार घेऊन शीतल म्हात्रे थांबल्या नाहीत तर त्यांनी उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना भेटल्याचा फोटोही पोस्ट करून प्रत्युत्तर दिलं आहे.
शीतल म्हात्रे यांनी ट्विट करून संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सिल्व्हर ओकची चाकरी करणाऱ्या पायपुसण्याने खुर्चीकरिता सोनियाच्या दारी मुजरा करणाऱ्या पहिल्या ठाकरे पिता-पुत्रासंदर्भात आधी स्पष्टीकरण द्यावे. मग दुसर्यांवर टीका करावी. राजकारणासाठी बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि सामनातून त्यांचे फोटो वगळायचे हीच थुकरट प्रवक्त्यांची निती, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
फोटो ट्विट
शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत उद्धव ठाकरे हे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा फोटो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. त्यावर शिंदे हे दिल्लीत मुजरा करायला गेल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट करून कोण कुणाला मुजरा करायला गेलं होतं? असा सवालच अप्रत्यक्षपणे केला आहे. उद्धव ठाकरेही दिल्लीत जात होते. दिल्लीतील काँग्रेसच्या हायकमांडला भेटत होते. त्याचाच हा फोटो पुरावा असल्याचं शीतल म्हात्रे यांना सूचवायचं आहे.
सिल्व्हर ओकची चाकरी करणा-या पायपुसण्याने खुर्चीकरिता सोनियाच्या दारी मुजरा करणाऱ्या पहिल्या ठाकरे पिता-पुत्रासंदर्भात आधी स्पष्टीकरण द्यावे आणि मग दुसर्यांवर टिका करावी… राजकारणासाठी बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि सामनातून त्यांचे फोटो वगळायचे हीच थुकरट प्रवक्त्यांची निती!!! pic.twitter.com/sqwRn5jnQu
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) June 5, 2023
राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली होती. एकनाथ शिंदे यांचं हायकमांड पूर्वी महाराष्ट्रात होतं. आता दिल्लीत आहे. त्यामुळेच ते वारंवार दिल्लीत जात आहेत. दिल्लीच्या वाऱ्या त्यांच्या वाढल्या आहेत. शिंदे स्वत:ला असली शिवसेना समजतात. पण बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कधी मंत्रिमंडळ विस्ताराची यादी घेऊन दिल्लीत गेले नव्हते. शिवसेनेने कधी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली नव्हती. तुम्ही असली शिवसेना आहात तर तुम्हीही हे का करत आहात?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.