शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 40 आमदार अपात्र ठरतील; संजय राऊत यांचं मोठं विधान
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. उद्या 2024 मध्ये कुणाचं सरकार येईल माहीत नाही. तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून कोणी काम केलं तर तुम्ही काय कराल?
मुंबई : जे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकले नाही, ते स्थिर किंवा वैध आहे हे कसं म्हणणार? त्यांच्या डोक्यावर आजही अपात्रतेची टांगती तलवार आहे. 40 चे 40 आमदार अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्लं हे बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे आमचा आशेचा किरण आहे. भीती आहे म्हणूनच विस्तार होत नाही, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. ठाकरे गटाला विधीमंडळात कार्यालय नाहीये. त्याबाबतही संजय राऊत यांना विचारण्यात आलं. अशा प्रसंगातूनच पुढे जायचं आहे. न्यायालयात लढाई सुरू आहे. कोणी नाव, धनुष्यबाण चोरलंय म्हणून रडत न बसता पुन्हा नव्याने शिवसेना उभी करण्याचं काम करत आहोत. सध्या शिवगर्जना हा उपक्रम सुरू आहे. काल वरळीत सभा झाली. हजारो लोक जमले. चिन्ह, नाव नसताना लोक जमत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत
देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेचा डाव होता. त्या कटाचा मी साक्षीदार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यावर संजय राऊत संतापले. मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे. कुणावरही राजकीय सूडाने कारवाई करायची नाही, असं आमचं धोरण होतं. उद्धव ठाकरे हे संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते.
त्यानुसार त्यांनी काम केलं आहे. नाही तर आम्ही संथगतीने तपास केले नसते, असं राऊत म्हणाले. आयएनएस विक्रांत घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा होता. या प्रकरणात अटक करता आली असती. पण नव्या सरकारने अनेक प्रकरणं दडपून टाकली. क्लिनचीट दिली. हाच मोठा घोटाळा आहे. क्लिनचीट देणाऱ्यांविरोधात याचिका दाखल केली पाहिजे, असंही ते म्हणाले.
तेव्हा काय कराल?
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. उद्या 2024 मध्ये कुणाचं सरकार येईल माहीत नाही. तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून कोणी काम केलं तर तुम्ही काय कराल? तुम्ही जो पायंडा पाडला तो घातक आहे. या देशात असं काही घडत नव्हतं. ते घडत आहे, असं त्यांनी सांगितलं.
शेलारांची याचिका वाचा
महाराष्ट्रातील 40 आमदार फूटून गेले. मुख्यमंत्र्यांसहीत सर्व गेले. त्यांच्यावरील आरोप कोणते आहेत ते पाहा. आशिष शेलार यांची नगरविकास खात्याबाबतची याचिका वाचा. हे सीबीआय, ईडीला दिसत नाही. फक्त विरोधक दिसत आहेत. हे गंभीरप्रकरण आहे, अशी टीका त्यांनी केली.