कोस्टल रोडचा अजून पत्ता नाही, सेना-भाजपकडून श्रेयवादाची लढाई सुरु
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं अद्याप कामही सुरु झाले नाही. मात्र, त्याआधीच शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्य श्रेयवादाची लढाई सुरु झाली. कोस्टल रोड उद्धव ठाकरेंमुळे होणार असल्याचे शिवसेनेचे नेत सांगत असताना, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आज म्हणाले, कोस्टल रोडला सर्व परवानग्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या आहेत. आशिष […]
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं अद्याप कामही सुरु झाले नाही. मात्र, त्याआधीच शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्य श्रेयवादाची लढाई सुरु झाली. कोस्टल रोड उद्धव ठाकरेंमुळे होणार असल्याचे शिवसेनेचे नेत सांगत असताना, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आज म्हणाले, कोस्टल रोडला सर्व परवानग्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या आहेत.
आशिष शेलार काय म्हणाले?
“कोस्टल रोडला सर्व परवानग्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून आणल्या आहेत. पण श्रेयवाद ही भाजपची संस्कृती नाही. ज्यांना श्रेय घ्यायचे आहे, त्यांना घेऊ द्या. कोस्टल रोडमुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे, ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.”, असे भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले.
उद्धव ठाकरेंकडून भूमीपूजन
कोस्टल रोडच्या श्रेयावरून एकीकडं शिवसेना आणि भाजपमध्ये पोस्टर युद्ध रंगलं असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करुन दाखवले असे सांगत कोस्टल रोडचे भूमीपूजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या कल्याण येथील मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावलण्यात आल्याचा वचपा शिवसेनेने सागरी किनारा मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यातूनच उघडपणे काढला आहे. निवडणूक वचननाम्यात दिलेल्या वचनाची शिवसेनेनं वचनपूर्ती केल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
कोस्टल रोडच्या भूमिपूजन होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील कोळी बांधवच्या अन्यायाबद्दल शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणातचं कोळी बांधवाना कुठल्याही प्रकारचा धक्का बसणार नाही, याची हमी दिली. कोस्टल रोडला केंद्र आणि राज्य सरकारनं विविध परवानग्या दिल्यानं उद्धव ठाकरेंनी सरकारचे आभार मानताना पारदर्शक कारभाराबद्दल भाजपाला टोला लगावण्यास विसरले नाहीत.
टोल फ्री कोस्टल रोड
कोस्टल रोड टोल फ्री करण्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. मुंबई शहरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यान कोस्टल रोड हा 9.98 किमी लांबीचा असणार आहे. कोस्टल मार्गामुळे 34 % इंधनाची बचत होणार आहे, कोस्टल रोडवर 1650 वाहने पार्किंगची सोय असेल, बांधकामासाठी 4 दशलक्ष मेट्रिक टनचं मटेरियल लागणार आहे. माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार येणार असून, बांधकामासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागणार आहे, कोस्टल रोडमुळं 26 हजार कोटी रुपयांची 90 हेक्टर जमीन खुली होणार आहे. विशेष म्हणजे पुरामध्येही कोस्टल रोडचा वापर शक्य होणार आहे.
कोस्टल रोड कसा असेल, काय वैशिष्ट्य आहेत?
- साडे सहा किलोमीटरचे बोगदे
- आठ लेनचा मार्ग, मार्गावर ४ इंटरचेंज
- सिग्नल फ्री मार्ग
- 34 % इंधन बचत होणार
- 1650 वाहन पार्किंगची सोय
- 4 दशलक्ष मेट्रिक टनच मटेरियल वापरणार
- माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार
- 4 वर्षाचा कालावधी
- 90 हेक्टर ओपन जागा, 26 हजार कोटींची जागा उपलब्ध होणार
- पुरामध्ये ही हा मार्ग वापरू शकतो