‘एपिसोड ठरलेलाय, घोषणाही निश्चित, कलायमॅक्स असा असेल की…’, संजय शिरसाट यांचा ठाकरेंबद्दल दावा
असा मुर्खपणा आम्ही करत नाही, स्वत:ची माणसे बोलवून आम्ही स्वत:चा जयजयकार करत नाही. उठाव होण्याचे कारण कऱ्हाडे मास्तर यांनी सांगितले आहे. स्वत:चे घर तुम्ही स्वःताच फोडले", अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
मुंबई | 16 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालावर ते आज सविस्तर भूमिका मांडणार आहेत. या पत्रकार परिषदेची जोरदार तयारी करण्यात आलीय. पण त्यांच्या या पत्रकार परिषदेवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सडकून टीका केलीय. “महाराष्ट्राला कधीही न घडलेला इव्हेंट आज पहायला मिळेल. त्यांचे डायरेक्टर संजय राऊत आहेत. तुम्हालाही आमंत्रण असेल, माझंही नाव संजय आहे, मलाही दूरचं दिसतं, उद्धव ठाकरे येतील जयघोष होईल काळे कोर्टातले नागरिक येतील. मेरी आवाज सुनो पार्ट 2 तिथे पहायला मिळेल. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात की ते का नाही अशी प्रत्रकार परिषद घेत? त्यांना बोलयचा अधिकार नाही. यांचं म्हणजे हम करे सो कायदा आहे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. “एपिसोड ठरलेला आहे, काय घोषणा आहेत ते पण ठरलेलं आहे. कलायमॅक्स असा असेल की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार”, अशीदेखील टीका शिरसाट यांनी केली.
“काही मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौर्यावर टीका करत आहेत. काहीजण मुख्यमंत्र्यांसोबत गेले आहेत. त्यावरही त्यांनी आरोप केले. मात्र ज्यावेळी ठाकरे गटाचे सुभाष देसाई उद्योगमंत्री होते तेव्हा त्याच्या कार्यकाळात दौर्यातून कीती उद्योग आले ते सांगावं. गगराणी हे काय शिंदेंच्या मावशीचा मुलगा नाही, मी यादी पाहिली १४ जणं गेलेत, मिनिट टू मिनिट दौरा ठरलेला आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.
‘सुभाष देसाई यांच्या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरेंचा काय रोल होता?’
“सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यात आदित्य ठाकरेंचा काय रोल होता? कोणते प्रोजेक्ट रन करत आहेत? आज १ लाख ३० कोटींचा MOU साईन होत आहे. १४ लोक आणि काही अधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत गेले आहेत. शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा त्यांच्यासोबत गेले आहेत, ते त्यांच्या पैशाने गेले आहेत. त्यांचे वडील संस्थापक सदस्य आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकट्याने जायचे का?”, असं शिरसाट म्हणाले.
‘मिलिंद देवरा यांच्या वडिलांचे योगदान आहे म्हणून…’
“शिवसेना नेते मिलिंद देवरा हे त्यांच्या पैशाने जात आहेत. त्या फोरममध्ये देवरांच्या वडिलांचे योगदान आहे म्हणून त्यांना बोलावले. झालेले एमओयू मुख्यमंत्री स्वत: सांगतील. प्रत्येक खात्याचा सहभाग आहे. सगळे मंत्री जाऊ शकत नाहीत म्हणून त्याचे ओएसडी किंवा त्यांचे सचिव गेले आहेत. कोण आवश्यक आहे हे मुख्यमंत्री ठरवतील. आले तरी अयोग्य नाही गेले तरी अयोग्य नाही”, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली.
‘…तर पोलीस ठाण्यात तक्रार करा’
“तुम्ही एका उद्योगपतीचे विमान घेऊन फिरत होतात तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. असा मुर्खपणा आम्ही करत नाही, स्वत:ची माणसे बोलवून आम्ही स्वत:चा जयजयकार करत नाही. उठाव होण्याचे कारण कऱ्हाडे मास्तर यांनी सांगितले आहे. स्वत:चे घर तुम्ही स्वःताच फोडले”, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी सुनावलं. यावेळी संजय शिरसाट यांना लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “लोकसभा निवडणूकीचा कुठलाही फार्म्युला ठरलेला नाही. सध्या एकच महत्वाचं, ते म्हणजे राम लल्लाचा उत्सव”, असं शिरसाट म्हणाले. तसेच “पक्ष चोरीला गेला असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार करा”, असा टोला शिरसाट यांनी ठाकरेंना लगावला.